शेफाली परब-पंडित, मुंबईविकास आराखड्यात नियोजनाचे गणित अनेक ठिकाणी बिघडल्याची काही धक्कादायक उदाहरणेही आहेत़ पुरातन चर्चच्या जागी अनाथाश्रम, झोपडपट्टी पुनर्विकास योजनेंतर्गत इमारतींऐवजी नैसर्गिक झरा भू वापर नकाशामध्ये दर्शविण्याचे प्रकारही घडले आहेत़ त्यामुळे अस्तित्वात असलेली प्रार्थनास्थळे, इमारती, शाळांवर बुलडोझर फिरवून हा विकास होणार आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून होऊ लागला आहे़विक्रोळी पूर्व येथील ३६९६ चौ़मी़च्या भूखंडावर झोपडपट्टी पुनर्विकास योजनेंतर्गत प्रकल्प सुरू आहे़ त्यानुसार एक इमारत प्रकल्पग्रस्तांची तर दुसऱ्या इमारतींमधील सदनिका विक्रीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत़ परंतु विकास नियोजन आराखड्यात या जागेवर नैसर्गिक झरा दर्शविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार वास्तुविशारद पारस पाठक यांनी निदर्शनास आणला आहे़ विलेपार्ले पश्चिम येथील चारशे वर्षे जुन्या सेंट फ्रान्सिस झेव्हियर्स चर्चबाबतीतही असाच घोळ विकास आराखड्यात घालण्यात आला आहे़ भू वापर नकाशामध्ये या चर्चची नोंद अनाथाश्रम अशी करण्यात आली आहे़ त्यामुळे भविष्यात चर्चची दुरुस्ती करायची झाल्यास कागदोपत्री अनाथाश्रमाची नोंद असल्याने जागेच्या वापरात बदल करून घेण्याची वेळ स्थानिकांवर येणार आहे़
एसआरए इमारती गेल्या पाण्यात!
By admin | Published: April 04, 2015 5:45 AM