ऐन गणेशोत्सवात मालाडच्या कुरार व्हिलेज मधील आठ झोपडीधारकांना एसआरए ची निष्कासनाची नोटीस
By मनोहर कुंभेजकर | Published: September 20, 2023 04:17 PM2023-09-20T16:17:31+5:302023-09-20T16:18:53+5:30
आपण वरिष्ठ उच्च अधिकाऱ्यांच्या लक्षात ही बाब आणून द्यावी असे ही खासदार गोपाळ शेट्टी यांनी पत्रात म्हटले आहे.
मुंबई-झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) ने मालाङ ( पूर्व) कुरार व्हिलेज येथील माऊली विकासकाद्वारे निर्मित होत असलेल्या योजनेत सन १९९५ पूर्वी पासून रहात असलेल्या पहिल्या माळ्यावरील आठ रहिवाश्यांना ऐन गणेशोत्सवाच्या काळात निष्कासनाची नोटीस पाठवली आहे. हा विभाग उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या लोकसभा मतदार संघात येतो. सध्या संसदेचे विशेष अधिवेशन सुरू असल्याने ते दिल्लीत आहेत. त्यांना ही बाब कळताच त्यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बांद्रा (पूर्व) मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांना पत्र पाठवून गणेशोत्सव काळात झोपडपट्टी धारकांवर अशा प्रकारचे संकट लादणे हे शोभनीय नसून संसदेचे विशेष अधिवेशन संपताच या विषयी मी आपली भेट घेईन तोपर्यंत कोणतीही कारवाई करू नये असे स्पष्ट बजावले आहे.
आपण स्वतः १९९५ पर्यंतच्या खासगी जमिनीवरील पहिल्या माळ्यावरील लोकांना जागा मिळाली पाहिजे यासाठी संघर्ष करीत असून त्याला जवळ जवळ सर्वांची मान्यता देखील मिळाली आहे.मात्र असे असताना, विकासकांवरती २००० ते २०११ पर्यंतच्या सदनिकाधारक जोपर्यंत पात्र होत नाहीत तोपर्यंत त्यांना भाडे देऊन त्यांचे स्थलांतर करण्याची तरतूद असताना देखील आपल्या प्राधिकारणाद्वारे त्यांना नोटीस पाठवण्याचे कारण मी समजू शकत नाही असे त्यांनी खेदाने पत्रात नमूद केले आहे.
सदर योजनेतील विकासकाने सर्वांना भाडे देऊन स्थलांतर केले असले आणि जर या आठ लोकांमुळे योजना थांबत असेल तर नक्कीच या आठ झोपडपट्टीधारकांना भाडे देऊन स्थलांतरित केले पाहिजे आणि विकास कामाला चालना, गती मिळालीच पाहिजे.परंतू तसे न करता ऐन गणेशोत्सवाच्या वेळी झोपडपट्टीधारकांवर अशा प्रकारचे संकट लादणे हे शोभनीय नसून आपण कृपया या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन विकासका बरोबर चर्चा विनिमय करावा असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
चटई क्षेत्रफळ न वाढवता सध्याच्या धोरणानुसार घनतेप्रमाणे सर्व झोपडीधारक समाविष्ट होत असल्यास २०११ पर्यंतच्या झोपडपट्टीधारकांना त्याच योजनेत जागा देण्याची तरतूद नवीन कायद्यात आहे. आपण वरिष्ठ उच्च अधिकाऱ्यांच्या लक्षात ही बाब आणून द्यावी असे ही खासदार गोपाळ शेट्टी यांनी पत्रात म्हटले आहे.