एसआरएचा बिल्डरना चाप; आगीच्या घटनेनंतर लिफ्ट, देखभाल-दुरुस्तीवर भर देण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 09:22 AM2023-12-12T09:22:10+5:302023-12-12T09:24:17+5:30

एसआरए इमारतीमधील सुरक्षेबाबत सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात याव्यात, तसेच इमारतीच्या लिफ्टची देखभाल दुरुस्ती आणि फॅब्रिकेट जिन्याच्या वापरावर बिल्डरने भर द्यावा, असे आदेश प्राधिकरणाने दिले आहेत.

SRA orders builders to focus on lifts maintenance after arc fire incident in mumbai | एसआरएचा बिल्डरना चाप; आगीच्या घटनेनंतर लिफ्ट, देखभाल-दुरुस्तीवर भर देण्याचे आदेश

एसआरएचा बिल्डरना चाप; आगीच्या घटनेनंतर लिफ्ट, देखभाल-दुरुस्तीवर भर देण्याचे आदेश

मुंबई : गोरेगाव उन्नत नगर येथील जयभवानी माता एसआरए इमारतीला लागलेल्या आगीत नाहक बळी गेले होते. या घटनेनंतर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आता बिल्डरांबाबत अधिक कठोर झाले असून मुंबईतील एसआरए इमारतीमधील सुरक्षेबाबत सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात याव्यात, तसेच इमारतीच्या लिफ्टची देखभाल दुरुस्ती आणि फॅब्रिकेट जिन्याच्या वापरावर बिल्डरने भर द्यावा, असे आदेश प्राधिकरणाने दिले आहेत.

एसआरए इमारतींमध्ये राहत असलेल्या रहिवाशांना सातत्याने देखभाल दुरुस्तीच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मुळात इमारत बांधून दिल्यानंतर बिल्डरने किमान दहा वर्षे तरी प्रमुख गोष्टींची देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक आहे, असे एसआरएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, बिल्डरकडून रहिवाशांची अडवणूक केली जाते. परिणामी अनेक इमारतीमधील सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर असतो शिवाय अनेक इमारतींमधील रहिवाशांना पाण्यापासून वंचित राहावे लागते. जय भवानी माता या एसआरए दुर्घटनाग्रस्त इमारतीनंतर हे सगळेच प्रश्न पुन्हा चर्चेला आले असून, प्राधिकरणाने याबाबत कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

... तेव्हाच पुढील कालावधीसाठी करार

  ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळवण्यापूर्वी नव्याने बांधलेल्या इमारतीसाठी अग्नि सुरक्षा उपकरणे आणि प्रतिबंधात्मक उपायांचे सीएफओकडून पूर्णत्व प्रमाणपत्र प्राप्त करावे. शिवाय (३२ मीटर पर्यंत उंची म्हणजेच तळमजला ७ व्या मजल्यापर्यंत) सामान्य पॅसेजमधून थेट प्रवेश मिळवून देईल, अशा शिडीची उपाययोजना करणे.  
  ओसीसीच्या तारखेपासून १० वर्षांनंतर संबंधित सोसायटी / मालक / पक्ष अग्निशमन उपकरणे पुरवणारी कंपनी / लिफ्ट सप्लाय कंपनी / इलेक्ट्रो मेकॅनिकल सिस्टम सप्लाय कंपनीसोबत पुढील कालावधीसाठी करार करेल.

प्राधिकरणाने दिलेले आदेश नेमके कोणते?

  ‘पी’दक्षिण प्रभागातील जय भवानी माता येथे लागलेल्या आगीच्या घटनेसाठी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीने आगीपासून सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी खबरदारीच्या उपायांची सूचना केली आहे.
  आगीपासून सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी उपकरणांचे अग्निशामक पूर्णत्व प्रमाणपत्र बंधनकारक आहे.
  पुनर्वसन इमारती / पुनर्वसन विंग / संयुक्त इमारतींना शिडीची तरतूद करावी.
  लिफ्टला जाळीच्या दाराच्या जागी स्टीलचे दरवाजे बसवणे. 
  ओसीसीपूर्वी बिल्डरने अग्निशमन आणि जीवन सुरक्षा उपकरणे आणि त्याची चांगली आणि कार्यक्षम स्थिती यांच्या देखभालीबाबत प्रमाणपत्र सादर करावे.
  इमारतीला ओसीसी दिल्यानंतर, संबंधित सोसायटी / कब्जेदार / पक्षाने महापालिका नोंदणीकृत अग्निशमन आणि जीवन सुरक्षा सल्लागाराकडून वर्षातून दोनदा म्हणजे जानेवारी / जुलै महिन्यात अग्निशमन आणि देखभालीच्या संदर्भात एक प्रमाणपत्र सादर करावे.

Web Title: SRA orders builders to focus on lifts maintenance after arc fire incident in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई