बृहन्मुंबईतील सर्व झोपडपट्ट्याचे सर्वेक्षण कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचे काम झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने हाती घेतले असून त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. आतापर्यंत सात लाख 36 हजार 393 झोपड्यांना क्रमांकित करण्यात आले असून चार लाख 98 हजार 511 झोपड्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या सर्वेक्षणातून प्राप्त माहिती संकलित करून तिचे जतन करण्यासाठी प्राधिकरणात अद्ययावत माहिती केंद्र विकसित करण्यात आले आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनांना विलंब लागण्यामागे परिशिष्ट दोन म्हणजे झोपडीवासीयांची पात्र-अपात्र यादी वेळेवर प्रमाणित न होणे हे एक कारण होते. त्यामुळे आता सक्षम प्राधिकरण कक्ष मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अंतर्गत स्थापन करण्यात आला आहे. त्यामुळे परिशिष्ट दोन मंजूर होण्याचा वेग वाढला आहे. त्याचा फायदा अर्थातच झोपडपट्टी पुनर्वसन योजनांच्या मंजुरीलाही वेग आला आहे.
शासनाने आता पाच वर्षानंतर पुनर्वसनातील घर विकण्यास परवानगी दिली आहे. अशा वेळी घराचे हस्तांतरण सुलभ व्हावे यासाठी प्रत्यक्ष संपर्क न येता यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित रहिवाशाला ऑनलाइन आवश्यक ती कागदपत्रे सादर करावी लागतील, या कागदपत्रांची छाननी होऊन ऑनलाइनच त्याला घराचे हस्तांतरण पत्र देण्यात येणार आहे. प्राधिकरणाकडे भरावयाचे पैसेही आता ऑनलाइनच स्वीकारले जाणार आहेत. त्यासाठी पेमेंट गेटवे सुरु करण्यात येणार आहे. सशुल्क झोपडीवासीयांसाठीही ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. राईट टू सर्विस अंतर्गतही झोपडीवासीयांसाठी अनेक बाबी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, झोपडीवासीयांना प्राधिकरणात खेटे घालावे लागू नयेत, या दिशेने यंत्रणा कार्यान्वित केली जात आहे. येत्या काही महिन्यांत प्राधिकरणाच्या सध्याच्या कार्यालयाचा संपूर्णपणे कायापालट झालेला दिसेल. हा कायापालट केवळ बाह्य स्वरुपात नसेल तर प्राधिकरणाच्या अंतर्गत रचनेतही बदल जाणवेल प्रत्येकावर विशिष्ट जबाबदारी असेल. झोपडीवासीय हा केंद्रबिंदू असेल, मानवविरहित यंत्रणा निर्माण करण्याचा आपला प्रयत्न आहे.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबईच्या वेबसाईटला भेट द्याः http://sra.gov.in/