संकटात एसआरए मदतीला धावणार; आपत्कालीन व्यवस्थापन कक्षातून नियंत्रण
By सचिन लुंगसे | Published: May 24, 2024 06:01 PM2024-05-24T18:01:27+5:302024-05-24T18:01:40+5:30
मान्सून काळात विविध दुर्घटना होत असतात. या दुर्घटनांवर नियंत्रण ठेवण्यासह घटनास्थळी मदत करण्याबाबत एसआरएच्या आपत्कालीन कक्ष काम करणार आहे.
मुंबई - मान्सूनदरम्यान घडणा-या दुर्घटनांवेळी दुर्घटनाग्रस्तांना तत्काळ मदत मिळावी म्हणून झोपडपटटी पुनर्वसन प्राधिकरण सज्ज झाले असून, यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नियंत्रण कक्षाचे कामकाज पाहण्यासाठी नियंत्रण अधिका-यासह अभियंत्यांची नेमणूक करण्यात आली असून, दुर्घटनास्थळावर वेगाने मदत पोहचविणे हे प्रमुख काम आपत्कालीन नियंत्रण कक्षाद्वारे केले जाणार आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात एसआरएच्या बहुसंख्य इमारती असून, यातील अनेक इमारती जुन्या झाल्या आहेत. मान्सूनदरम्यान अशा इमारती कोसळून रहिवाशांचा नाहक बळी जाण्याची भीती असते. शिवाय मान्सून काळात विविध दुर्घटना होत असतात. या दुर्घटनांवर नियंत्रण ठेवण्यासह घटनास्थळी मदत करण्याबाबत एसआरएच्या आपत्कालीन कक्ष काम करणार आहे.
आपत्कालीन कक्षात कोण ?
वांद्रे येथील एसआरएच्या इमारतीच्या आवारात हा कक्ष आहे. अभियांत्रिक विभागात काम करणारे सहाय्यक अभियंता आणि दुय्यम अभियंता कक्षात नियंत्रण अधिकारी म्हणून काम करतील.
काम कसे केले जाईल ?
१ जून ते ३० नोव्हेंबरपर्यंत नियंत्रण अधिकारी २४ तास मोबाईलद्वारे आपत्कालीन कक्षातील ऑपरेटरशी संपर्कात राहतील. काही अघटीत घडल्यास संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंत्याशी संपर्क साधून माहिती देतील.
मदत कशी मिळणार ?
संबंधित कार्यकारी अभियंत्यामार्फत कक्षाचा ताबा घेवून त्यासाठी लागणारी यंत्र सामुग्री व संबंधितांशी संपर्क साधण्याचे काम कार्यकारी अभियंता करणार आहेत.
सद्यस्थितीचा अहवाल देणार
नियंत्रण कक्षामधील दुय्यम अभियंता किंवा सहाय्यक अभियंता, संबंधित विभागातील सहाय्यक अभियंता व दुय्यम अभियंता घटनास्थळी दाखल होत तेथील काम पाहतील. सद्यस्थिती अहवाल कार्यकारी अभियंता यांनी देतील, या पध्दतीने काम करत दुर्घटनाग्रस्तांना मदत करण्याचे काम याकाळात एसआरएकडून केले जाईल.