‘एसआरए’कडून प्रकल्पग्रस्तांसाठी ३४३ गाळे ‘एमएमआरडीए’ला हस्तांतरित; ठाणे-बोरिवली ट्विन टनेलची अधिग्रहण प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 14:08 IST2025-01-01T14:08:17+5:302025-01-01T14:08:27+5:30

या प्रकल्पाचे आता ठाणे बाजूकडील काम सुरू झाले आहे. कंत्राटदाराने टीबीएम मशीन बोगद्यात उतरविण्यासाठी शाफ्ट उभारणीचे काम सुरू केले आहे.

SRA transfers 343 acres to MMRDA for project-affected people; Acquisition process of Thane-Borivali Twin Tunnel begins | ‘एसआरए’कडून प्रकल्पग्रस्तांसाठी ३४३ गाळे ‘एमएमआरडीए’ला हस्तांतरित; ठाणे-बोरिवली ट्विन टनेलची अधिग्रहण प्रक्रिया सुरू

‘एसआरए’कडून प्रकल्पग्रस्तांसाठी ३४३ गाळे ‘एमएमआरडीए’ला हस्तांतरित; ठाणे-बोरिवली ट्विन टनेलची अधिग्रहण प्रक्रिया सुरू

मुंबई : पश्चिम उपनगरे ठाण्याशी जोडण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ठाणे-बोरिवली ट्विन टनेल प्रकल्पग्रस्तांच्या (बोरिवली बाजूकडील) रहिवाशांचे स्थलांतरण करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) ३४३ गाळे ‘एमएमआरडीए’ला हस्तांतरित केले आहेत. तसेच संबंधित जमिनीच्या अधिग्रहणाची प्रक्रियाही सुरू असून लवकर ती पूर्ण होईल, अशी माहिती ‘एसआरए’च्या अधिकाऱ्यांनी दिली. 

या प्रकल्पाचे आता ठाणे बाजूकडील काम सुरू झाले आहे. कंत्राटदाराने टीबीएम मशीन बोगद्यात उतरविण्यासाठी शाफ्ट उभारणीचे काम सुरू केले आहे. मात्र, या प्रकल्पाची बोरिवली बाजूकडील भुयारीकरणापूर्वीची प्राथमिक कामेही सुरू झालेली नाहीत. त्यासाठी आवश्यक असलेल्या जमिनीवरील रहिवाशांचे स्थलांतर करणे बाकी आहे. आता ‘एसआरए’ने या झोपडपट्टीधारकांचे स्थलांतरण करण्यासाठी आवश्यक असलेले ३४३ संक्रमण गाळे १९ डिसेंबरला ‘एमएमआरडीए’ला दिले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू असून एक महिन्यात ती पूर्ण होईल. मात्र, त्याचवेळी ‘एमएमआरडीए’ला यापूर्वीच संक्रमण गाळे उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे झोपडपट्टीधारकांशी करार करून घरे रिकामी करण्याची प्रक्रिया एमएमआरडीए करणार आहे. अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू असताना एमएमआरडीए झोपडपट्टीधारकांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करू शकते, असे एसआरएमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.  

प्रकल्पाची माहिती...
-  ठाणे-बोरिवलीदरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून एमएमआरडीएने ११.८५ किलोमीटरच्या मार्गाच्या उभारणीला सुरूवात केली.
-  या मार्गात १०.२५ किमीच्या बोगद्याचा समावेश, प्रकल्पासाठी १८,८३८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
-  एमएमआरडीएने मेघा इंजिनिअरिंगला जून २०२३ मध्ये प्रकल्पाचे काम दिले असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जुलैमध्ये त्याचे भूमिपूजन केले होते.
 

Web Title: SRA transfers 343 acres to MMRDA for project-affected people; Acquisition process of Thane-Borivali Twin Tunnel begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई