Join us

‘एसआरए’चा दणका;  213 प्रकल्पांचे बांधकाम थांबविले, वायुप्रदूषण रोखण्यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 14:36 IST

गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईत प्रदूषणाने कहर केला आहे...

मुंबई : वायुप्रदूषण रोखण्यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) २१३ प्रकल्पांना नोटीस बजावत काम थांबविण्याचे आदेश संबंधित बिल्डरांना दिले आहेत. दरम्यान, नियमांचे पालन केल्यावरच इमारतींचे बांधकाम सुरू करता येईल, असे ‘एसआरए’ने या नोटिसीत म्हटले आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईत प्रदूषणाने कहर केला आहे. या प्रदूषणाला मुंबईत सुरू असलेली इमारतींची बांधकामे जबाबदार असल्याचे समोर आले आहे. त्यावर उपाय म्हणून मुंबई महापालिकेने सर्व गृहनिर्माण प्रकल्पांना सूचना केल्या आहेत. या सूचनांनुसार इमारतींचे बांधकाम करावे, अन्यथा कारवाई केली जाईल, असे बजावले आहे. 

पालिकेकडून अशा खासगी बिल्डरांविरोधात कारवाई सुरू असतानाच आता ‘एसआरए’नेही वायुप्रदूषण कमी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार, मुंबई शहर आणि उपनगरांत सुरू असलेल्या ‘एसआरए’च्या गृहनिर्माण प्रकल्पांपैकी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांना नोटीस बजावत काम थांबविण्याचे आदेश दिले आहेत.

बिल्डरांनी काय खबरदारी घ्यावी?-  बांधकामाधीन इमारत चोहोबाजूंनी आच्छादन लावून पूर्णपणे झाकून बंदिस्त करावी.-  बांधकाम प्रकल्पाभोवती किमान २५ फूट उंचीचा पत्रा अथवा धातूचे आच्छादन असावे.-   बांधकामांच्या ठिकाणी असलेल्या राडारोड्याची तातडीने विल्हेवाट लावावी.-  प्रकल्पस्थळी बेवारस वाहने असू नयेत.-  प्रकल्पांच्या ठिकाणी ये-जा करणाऱ्या वाहनांची चाके नियमितपणे धुतली जावीत, त्यासाठी आवश्यक यंत्रणा बिल्डरांनी उभारणे गरजेचे आहे.-  प्रकल्पांमध्ये वायूप्रदूषण मोजणारी व वायूप्रदूषण नियंत्रण करणारी सर्व यंत्रणा कार्यान्वित असणे सक्तीचे आहे.

 

टॅग्स :सरकार