Join us

'श्री तशी सौ'ने पटकावला सुवर्णपर्व एकांकिका करंडक

By संजय घावरे | Published: December 05, 2023 6:07 PM

दुबईमध्ये जल्लोषात अंतिम फेरी पार पडली आहे.

मुंबई - कोरोनामुळे स्थगित झालेली सुवर्णपर्व एकांकिका करंडक स्पर्धा यंदा मोठ्या दिमाखात संपन्न झाली. महाराष्ट्र मंडळ दुबईच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत निलेश देशपांडे दिग्दर्शित आणि योगेश सोमण लिखित 'श्री तशी सौ' एकांकिकेने सर्वोत्कृष्ट एकांकिका, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री अशा महत्त्वाच्या पारितोषिकांसह सुवर्णपर्व एकांकिका करंडकावर आपले नाव कोरले.

महाराष्ट्र मंडळाच्या ५० व्या वर्षात आयोजित करण्यात आलेल्या सुवर्णपर्व एकांकिका करंडक २०२३ च्या प्राथमिक फेरीत युएईतून सहभागी झालेल्या ११ एकांकिका सादर झाल्या. त्यातून विनोदी, कौटुंबिक, सामाजिक अशा विविध आशयाच्या अव्वल ६  एकांकिका अंतिम फेरीसाठी निवडण्यात आल्या. प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या 'श्री तशी सौ' मागोमाग प्रकाश केळकर लिखित 'अनुभूती'ने दुसरे, तर अश्विनी धोमकर लिखीत-दिग्दर्शित 'वळण'ने तिसरे पारितोषिक आपल्या नावे केले. 'चक्रव्यूह' हि एकांकीका प्रेक्षकांची निवड बनली. अभिनेता, लेखक, दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. भारताबाहेर राहूनही या कलाविष्कारावर नुसतेच प्रेम नाही तर सादरीकरणात गाठलेल्या उंचीचे त्यांनी कौतुक केले आणि त्याबरोबर काम सांभाळून सहभागी झालेल्या प्रतिभावान कलाकारांचे त्यांनी मनापासून अभिनंदन करत त्यांना प्रोत्साहनही दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र लवाटे यांनी केले.

'परमोच्यबिंदू आणि म्ह्या'ने विशेष उल्लेखनीय पारितोषिक पटकावले. वैयक्तिक पारितोषिकांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता : निखिल फडके, प्रशांत फडणीस आणि मनोज कुलकर्णी, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : तेजस्विनी घैसास, प्रिया तेलवणे जाधव आणि अश्विनी धोमकर, सर्वोत्कृष्ट लेखक : प्रकाश केळकर आणि  स्नेहल देशपांडे, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : निलेश देशपांडे, सर्वोत्कृष्ट नेपथ्य : स्वाती खारकर, सर्वोत्कृष्ट पोस्टर : जयंत जोशी आणि अभिजीत भागवत यांनीही आपला ठसा उमटवला. 

टॅग्स :मुंबई