मुंबई - अभिजात सौंदर्य आणि अभिनयाच्या बळावर रसिक, चाहते आणि समीक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी, सिनेअवकाशातील 'चांदणी' श्रीदेवी निखळल्यानं अवघी चित्रपटीसृष्टी दुःखाच्या काळोखात बुडाली आहे. शनिवारी (24 फेब्रुवारी) रात्री संयुक्त अरब अमिरातमधल्या अबुधाबीत कार्डिअॅक अरेस्टने बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे निधन झाले. त्या अवघ्या 54 वर्षांच्या होत्या.
श्रीदेवी यांचे पार्थिव काही तासांतच दुबईहून मुंबईत आणण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. श्रीदेवी यांचे पार्थिव मुंबईत आणण्यासाठी देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांचे खासगी चार्टर्ड प्लेन दुबईमध्ये दाखल झाले आहे. मुंबईतील वर्सोवा येथील भाग्य बंगल्यात श्रीदेवी यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर सांताक्रूझमध्ये अंत्यसंस्कार होतील.
पार्थिव भारतात आणण्यास का होत आहे विलंब?बॉलिवूडमधील अभिनेत्री श्रीदेवी यांचे निधन होऊन 30 तास उलटले आहेत. यामुळे त्यांचे पार्थिव भारतात आणण्यास विलंब का केला जात आहे, अशा प्रश्न त्यांच्या चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. संयुक्त अरब अमिरातील कायद्यानुसार, कोणत्याही परदेशी व्यक्तीचा मृत्यू हॉस्पिटलबाहेर झाल्यास संबंधित व्यक्तीची शवविच्छेदन प्रक्रिया करावीच लागते. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, त्यांचे शवविच्छेदन व न्यायवैद्यक तपासणी पूर्ण झालेली आहे.
'खलीज टाइम्स'च्या वृत्तानुसार, रविवारी संध्याकाळीच श्रीदेवी यांची शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती दुबईतील अधिका-यांनी दिली होती. प्रोटोकॉलनुसार, दुबईमध्ये हॉस्पिटलबाहेर कोणत्याही परदेशी नागरिकाचा मृत्यू होतो, तेव्हा मृत्यूबाबतच्या चौकशीसाठी तब्बल 24 तासांचा वेळ लागतो, अशी माहितीही येथील अधिका-यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणातही पोलीस प्रोटोकॉलनुसार न्यायवैद्यक तपासणी पूर्ण करत आहेत.