मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याची गरज काय होती?, त्यांना तिरंग्याचा मान कशासाठी देण्यात आला?, असे प्रश्न गेल्या काही काळात उपस्थित झाले होते. त्यांना 'पद्मश्री'ने गौरवण्यात आलं असल्यामुळे सन्मानपूर्वक अखेरचा निरोप देण्यात आल्याचा अंदाज काहींनी वर्तवला होता. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून ही कार्यवाही झाली होती आणि त्याचा पद्म पुरस्काराशी काही संबंध नव्हता, अशी माहिती आता समोर आली आहे.
श्रीदेवी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे तोंडी आदेश मुख्यमंत्र्यांनी २५ फेब्रुवारी रोजी दिले होते आणि ते मुंबई उपनगर जिल्हाधिकारी आणि मुंबई पोलीस महासंचालकांना कळवण्यात आले होते, असा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाने केला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी याबाबत अर्ज महाराष्ट्र शासनाच्या राजशिष्टाचार विभागाकडे केला होता.
बॉलिवूडची 'चांदनी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी यांचं गेल्या महिन्यात, २४ फेब्रुवारी रोजी दुबईतील एका हॉटेलमध्ये निधन झालं होतं. त्यांचा मृत्यू बाथटबमध्ये बुडाल्यानं झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं होतं. त्यानंतर, २७ तारखेला त्यांचं पार्थिव मुंबईत आणण्यात आलं होतं आणि २८ फेब्रुवारीला त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यांचं पार्थिव तिरंग्यात लपेटून नेण्यात आलं होतं. त्यांना हा सन्मान देण्यात आल्यानं उलटसुलट चर्चा झाली होती.
श्रीदेवी यांना तिरंग्याचा मान देण्याच्या सरकारच्या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर जाहीर सभेतच सडकून टीका केली होती. पद्मश्री मिळाल्यामुळे श्रीदेवींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाल्याची चर्चा चुकीची असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर, अनिल गलगली यांनी याबाबतची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा, कुठलाही राष्ट्रीय पुरस्कार किंवा पद्म पुरस्कार मिळालाय म्हणून त्या व्यक्तीवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा नियम नाही. त्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेत असतात, असं राजशिष्टाचार विभागानं स्पष्ट केलं.
२२ जून २०१२ ते २६ मार्च २०१८ पर्यंत महाराष्ट्रात ४० व्यक्तींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.