मला अखेरचा निरोप 'असा' द्यावा, श्रीदेवींनी जिवंतपणी व्यक्त केली होती इच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 02:38 PM2018-02-26T14:38:47+5:302018-02-26T16:01:21+5:30
श्रीदेवी यांच्या निधनानंतर त्यांचे पार्थिव अल कुसेस येथील शवागृहात ठेवण्यात आले होते.
मुंबई: अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर त्यांचे पार्थिव दुबईहून लवकरच विमानाने मुंबईत आणण्यात येणार आहे. काही वेळापूर्वीच दुबईतील डॉक्टरांनी श्रीदेवी यांचा फॉरेन्सिक रिपोर्ट प्रसिद्ध केला. यामध्ये त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानेच झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता लवकरच उर्वरित कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून श्रीदेवी यांचे पार्थिव मुंबईत आणले जाईल.
मुंबईत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यासाठी श्रीदेवी यांच्या इच्छेप्रमाणे सर्व तयारी करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, श्रीदेवी यांनी आपल्या कुटुंबीयांना आपली ही शेवटची इच्छा सांगून ठेवली होती. अनेक मुलाखतींमध्येही त्यांनी याबद्दल उल्लेख केला होता.
श्रीदेवी यांना पांढरा रंग प्रिय असल्याचे बोलले जाते. अनेक चित्रपटांमध्ये श्रीदेवी पांढऱ्या रंगाच्या पोशाखात दिसून आल्या होत्या. त्यामुळे आपल्या अंतिम यात्रेला माझे पार्थिव पांढऱ्या रंगाच्या फुलांनी सजवण्यात यावे. त्यांची इच्छा लक्षात घेऊन कुटुंबीयांकडून त्यांच्या अंतिम यात्रेची सर्व तयारी करण्यात आली आहे. त्यानुसार श्रीदेवींचे पार्थिव ठेवण्यात येईल त्याठिकाणी मोगरा आणि गुलाबाच्या फुलांनी सजावट केली जाणार आहे.
श्रीदेवी यांच्या निधनानंतर त्यांचे पार्थिव अल कुसेस येथील शवागारात ठेवण्यात आले होते. यानंतर फॉरेन्सिक विभागाने श्रीदेवी यांच्या मृतदेहाची तपासणी केली. यानंतर पुढील कारवाईसाठी श्रीदेवी यांचा मृतदेह पोलिसांच्या हवाली करण्यात आला. पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर मृत्यू प्रमाणपत्र देण्यात आले. यानंतर भारतीय दूतावासाकडून श्रीदेवी यांचा सध्याचा पासपोर्ट रद्द करून त्यांच्या नावे सफेद रंगाचा पासपोर्ट जारी करण्यात येईल. त्यानंतर श्रीदेवी यांचे पार्थिव विमानाने मुंबईत आणण्यात येईल.