Join us

दारुच्या नशेत बाथटबमध्ये बुडून श्रीदेवीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 4:44 PM

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूबद्दल नवीन खुलासा झाला आहे. बाथटबमध्ये बुडून श्रीदेवी यांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे.

मुंबई -  बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूबद्दल नवीन खुलासा झाला आहे. बाथटबमध्ये बुडून श्रीदेवी यांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. ह्दयविकाराच्या झटक्यानंतर त्या बाथटबमध्ये पडल्या. गल्फ न्यूजने श्रीदेवी यांच्या शरीरात दारुचे अंश  सापडल्याचे वृत्त दिले आहे. बाथटबमध्ये बुडून अपघाती मृत्यू झाल्याचे न्यायवैद्यक अहवालात म्हटले आहे. श्रीदेवी यांचा मृत्यू संशयास्पद नसल्याचे या अहवालात म्हटले आहे. गल्फ न्यूजकडे श्रीदेवी यांचे डेथ सर्टीफिकेट असून त्याआधारे हे वृत्त दिले आहे. 

श्रीदेवी यांनी मद्यपान केल्यामुळे बाथटबमध्ये बुडून तिचा अपघाती मृत्यू झाला असा दुबई पोलिसांनी निष्कर्ष काढला आहे. गल्फ न्यूजने हे वृत्त दिले आहे. हा अपघात नेमका कशामुळे घडला त्याबद्दल तपास सुरु आहे. न्यायवैद्यक अहवालात फक्त बुडून मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. श्रीदेवी यांच्याबरोबर नेमके त्यावेळी कोण होते याबद्दल दुबई पोलीस तपास करत आहेत. न्यायवैद्यक अहवाल श्रीदेवीचे कुटुंबिय आणि भारतीय दूतावासाकडे सोपवण्यात आला आहे. 

श्रीदेवी नेमक्या कोणाला बेशुद्धा अवस्थेत दिसल्या श्रीदेवी यांच्या निधनानंतर अनेक प्रकारचे दावे समोर येत आहेत. पती बोनी कपूर यांना श्रीदेवी बाथटबमध्ये बेशुद्धावस्थेत पडलेली आढळल्या, असं वृत्त आधी समोर आलं. पण आता हॉटेल स्टाफकडून गंभीर दावा केला जातो आहे. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी श्रीदेवी यांना बाथरूममध्ये पडलेलं पाहिलं व त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेल्याचं वृत्त 'पिंकविला'ने दिलं आहे. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी अनेकदा रूमची बेल वाजवून श्रीदेवी यांनी प्रतिसाद दिला नाही. नंतर कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडल्यावर त्यांना श्रीदेवी बाथरूममध्ये पडलेल्या दिसल्या. 

शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास श्रीदेवी यांनी रूम सर्व्हिसला फोन करून पाणी मागितलं. हॉटेल स्टाफ 15 मिनिटांनी पाणी घेऊन श्रीदेवी यांच्या रूममध्ये पोहचला. अनेकदा रूमची बेल वाजवूनही श्रीदेवी यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आत काहीतरी झालं असावं, असा विचार करून हॉटेल स्टाफने दरवाजा तोडला. तेव्हा श्रीदेवी बाथरूममध्ये पडलेल्या स्टाफला दिसल्या. रात्री 11 वाजेच्या सुमारास ही संपूर्ण घटना घडली. हॉटेल कर्मचाऱ्यांनी श्रीदेवी यांना पाहिलं तेव्हा त्यांच्या ह्रदयाचे ठोके सुरू होते. श्रीदेवी त्यावेळी हॉटेलमध्ये एकट्याच होत्या, असा दावा केला जातो आहे. हॉटेलमधील सुत्रांनी दुबईतील एका प्रसिद्ध वृत्तपत्राला ही माहिती दिली. 

श्रीदेवींच्या मृत्यूबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. दुबईमधल्या एका पत्रकाराच्या मते, जर रुग्णालयात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्याचा मृतदेह कुटुंबीयांना सोपवण्यात येतो. परंतु जर मृत्यू रुग्णालयाच्या बाहेर झाल्यास पोलीस या प्रकरणाचा तपास करून गुन्हा दाखल करतात, असे दुबईमध्ये कायदे आहेत. आणि जर एखाद्याचा मृतदेह दुबईतून दुस-या देशात पाठवायचा असल्यास प्रक्रिया खूपच किचकट असते. दुबईमधल्या अशा कायद्यामुळेच श्रीदेवींचा मृतदेह भारतात आणण्यात विलंब होतोय.  

आता फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर त्यांचे मृत्युपत्र बनवण्यात येणार आहे. त्यानंतर श्रीदेवी यांचे पासपोर्ट तपासले जातील. मग दुबईतलं भारतीय दूतावास त्यांचा पासपोर्ट रद्द करेल. त्यानंतर नो ऑब्सेक्शन सर्टिफिकेट आणि मृत्युपत्र दिले जाईल. ही सर्टिफिकेट्स अरबी भाषेमध्ये असात. त्याचे इंग्रजी भाषांतर करण्यात येईल आणि ते सर्टिफिकेट श्रीदेवीच्या कुटुंबीयांना देण्यात येईल आणि त्यानंतर त्यांचे पार्थिव कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात येईल.

अभिनेत्री श्रीदेवी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले. त्या 54 वर्षांच्या होत्या. आपल्या कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या असताना शनिवारी रात्री त्यांना हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि पती बोनी कपूर असे कुटुंब आहे. त्यांच्या आकस्मिक झालेल्या निधनामुळे सिनेसृष्टीत व चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव संध्याकाळपर्यंत मुंबईत आणण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

टॅग्स :श्रीदेवी