मुंबई - अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने चित्रपटप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी यांचे दुबईत ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. एका विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी श्रीदेवी पती बोनी कपूर आणि मुलगी खुशीसह दुबईत होत्या. मात्र, दुसरी मुलगी जान्हवी कपूर चित्रीकरणात व्यस्त असल्यामुळे दुबईत गेली नव्हती. श्रीदेवी यांच्या मुंबई येथील घरी नातेवाईकांसह बॉलिवूडमधील लोक पोहोचण्यास सुरूवात झाली असून जानव्ही कपूरचे सांत्वन करण्यात येत आहे. दुबईतील लग्नाती व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्या आनंदात दिसत आहेत. चाहत्यांना अभिवादन करतानाही त्या दिसत आहे. त्यांच्या या अकाली जाण्यानं चाहत्यामध्ये आणि बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
श्रीदेवी यांचा प्रवास -
श्रीदेवीचा जन्म तामिळनाडूतील शिवकाशी या ठिकाणी झाला. तिचे वडील पेशाने वकील होते. तिला एक सख्खी आणि दोन सावत्र बहिणी आहेत. ‘थुनीवावन’ हा तिचा बालकलाकार म्हणून पहिला सिनेमा होता. या सिनेमात तिने मुरुगन ही देवाची भूमिका साकारली होती. ज्युली या हिंदी सिनेमातही श्रीदेवीच झलक दिसली होती. पण ती या सिनेमात मुख्य भूमिकेत नव्हती. पण, 1983 मध्ये 'हिम्मतवाला' हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि श्रीदेवी स्टार झाल्या. 1996 मध्ये निर्माते, दिग्दर्शक बोनी कपूर यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर जुदाई चित्रपटाचा अपवाद वगळता श्रीदेवी चित्रपटसृष्टीपासून दूर होत्या. त्यानंतर सहा वर्षानंतर श्रीदेवी यांनी मिसेस मालिनी अय्यर या मालिकेतून छोट्या पडद्यावर एंट्री केली. त्यानंतर 2012 साली आलेल्या 'इंग्लिश-विंग्लिश' या चित्रपटातून श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले. अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल श्रीदेवी यांनी भारत सरकारकडून पद्मश्री या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. मॉम हा श्रीदेवी यांचा शेवटचा चित्रपट ठरला.
श्रीदेवी यांचे काही गाजलेले चित्रपट....जुली, सोलावा सावन, सदमा, हिम्मतवाला, जाग उठा इन्सान, अक्लमंद, इंकलाब, तोहफा, सरफ़रोश, बलिदान, नया कदम, नगीना, घर संसार, नया कदम,मकसद, सुल्तान, आग और शोला, भगवान, आखरी रास्ता,जांबांज, वतन के रखवाले, जवाब हम देंगे, औलाद, नज़राना,कर्मा, हिम्मत और मेहनत, मिस्टर इंडिया, निगाहें, जोशीले ,गैर क़ानूनी,चालबाज,खुदा गवाह, लम्हे, हीर राँझा, चांदनी, रूप की रानी चोरों का राजा, चंद्रमुखी, चाँद का टुकड़ा,गुमराह,लाडला, आर्मी, जुदाई, हल्ला बोल, इंग्लिश विंग्लिश.
यांनी व्यक्त केलं दुख -
श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी समजताच बॉलिवूड, राजकरण आणि सोशल मीडियात शोक व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, रजनीकांत, कमल हसन, रितेश देशमुख, सिद्धार्थ मल्होत्रा, जॉनी लिव्हर, प्रियांका चोप्रा, प्रिती झिंटा, नेहा धुपिया, झरिन खान यांच्यासह अनेक बॉलिवूडच्या कलाकारांनी श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. प्रियांका चोप्राने शोक व्यक्त करताना ट्विटरवर लिहिले की, माझ्याकडे शब्द नाहीत. सर्वांकडून श्रीदेवींना श्रद्धांजली. आजचा काळा दिवस.