मुंबई – ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्यावर मालमत्तेवर धाड टाकल्यानं राज्यात खळबळ माजली आहे. पाटणकर यांच्या ११ सदनिका ईडीकडून जप्त करण्यात आल्या आहेत. जवळपास ६ कोटी ४५ लाख इतकी मालमत्ता ईडीनं जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. यात साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडच्या ठाण्यातील ११ सदनिकांचा समावेश आहे.
काय आहे प्रकरण?
श्रीधर पाटणकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू आहेत. ते साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडचे मालक असून या कंपनीच्या मालकीच्या ११ सदनिका जप्त करण्यात आल्यात. हमसफर डिलरनं पाटणकरांच्या कंपनीला ३० कोटी कर्ज दिले होते. मात्र हमसफर ही कंपनी बनावट असल्याचं ईडीचा आरोप आहे. नंदकिशोर चर्तुवेदी यांची हमसफर कंपनी आहे. त्यांच्याकडून पाटणकरांच्या कंपनीनं विनातारण कर्ज घेतले.
नंदकिशोर चतुर्वेदी आणि महेश पटेल यांनी पाटणकरांच्या कंपनीत पैसे दिले. या पैशातूनच ठाण्यात निलांबरी प्रोजेक्टचं बांधकाम करण्यात आले. नंदकिशोर चतुर्वेदी आणि महेश पटेल यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे. २०१७ त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
या कारवाईबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. पवार म्हणाले की, देशात केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर होतोय तो सर्वात मोठा प्रश्न आहे. आतापर्यंतची आकडेवारी पाहिली तर राजकीय हेतूने ही कारवाई करण्यात आल्याचं दिसून येते. मागील ५-६ वर्षात ईडी नावाची संस्था कुणाला माहिती नव्हती. परंतु आता गावागावात ईडी पोहचलीय. त्याचा गैरवापर दुर्दैवाने सुरू आहे. यावर पर्याय काय निघतो पाहावं लागेल अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी पाटणकर यांच्यावरील ईडीवर कारवाईवर दिली आहे.
उद्धव ठाकरेंना झोप लागणार नाही – किरीट सोमय्या
पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्यांनी यावर प्रतिक्रिया देत मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली आहे. उद्धव ठाकरेंचे सरकार माफिया सरकार आहे. श्रीधर पाटणकर यांच्या बँक खात्यातून पुढे कुणाला पैसे ट्रान्सफर झाले. त्याची माहिती जनतेसमोर आल्यास उद्धव ठाकरेंची झोप उडेल. पुढील काळात सर्व भ्रष्टाचाराचा हिशोब होणार असं त्यांनी सांगितले.