Join us

Sridhar Patankar ED Raids: नातेवाईकांच्या तिजोरीमध्ये कोट्यवधी अन् शिवसैनिकांच्या वाट्याला काहीच नाही – नारायण राणे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 9:09 PM

महाराष्‍ट्रात भ्रष्‍टाचाराने कळस गाठलाय. जनतेचे शोषण होत आहे. सूडबुद्धीने कारवाया होत आहेत. यालाच म्‍हणतात चोराच्‍या उलट्या बोंबा अशा शब्दात नारायण राणेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा समाचार घेतला आहे.

मुंबई – राज्यात ईडीच्या कारवायांवरून वादंग असतानाच आता ईडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाई केल्यानं खळबळ माजली आहे. ईडीने पाटणकर यांच्या ठाण्यातील ११ सदनिका जप्त केल्या आहेत. पाटणकर यांच्या साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडच्या या कंपनीच्या मालकीच्या या सदनिका होत्या. हमसफर कंपनीकडून विनातारण पाटणकर यांच्या कंपनीला कर्ज देण्यात आलं होते. याच प्रकरणी ईडीने कारवाई केली आहे.

ईडीच्या या कारवाईवरून राज्यात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले आहेत की, आप्‍तांच्‍या तिजोऱ्यांमध्ये मात्र कोट्यवधींची भर. ही संपत्‍ती कुठून आली? कोणाकडून आणली? शिवसैनिकांच्‍या वाट्याला यातील काहीही नाही. सत्ता फक्‍त आपण आणि आपल्‍या नातेवाईकांसाठीच! आगे आगे देखिए होता है क्‍या! असा इशारा त्यांनी दिला आहे.

तसेच महाराष्‍ट्रात भ्रष्‍टाचाराने कळस गाठलाय. जनतेचे शोषण होत आहे. सूडबुद्धीने कारवाया होत आहेत. यालाच म्‍हणतात चोराच्‍या उलट्या बोंबा. सव्वा दोन वर्षांत महाराष्‍ट्राच्‍या शेतकऱ्यांना, एसटी कर्मचाऱ्यांना काय मिळाले? त्‍यांच्‍या नशिबी आत्‍महत्‍या असा आरोपही नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर(Uddhav Thackeray) केला आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर हा मोठा प्रश्न - पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी ईडीच्या कारवाईवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. पवार म्हणाले की, देशात केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर होतोय तो सर्वात मोठा प्रश्न आहे. आतापर्यंतची आकडेवारी पाहिली तर राजकीय हेतूने ही कारवाई करण्यात आल्याचं दिसून येते. मागील ५-६ वर्षात ईडी नावाची संस्था कुणाला माहिती नव्हती. परंतु आता गावागावात ईडी पोहचलीय. त्याचा गैरवापर दुर्दैवाने सुरू आहे. यावर पर्याय काय निघतो पाहावं लागेल अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी पाटणकर यांच्यावरील ईडीवर कारवाईवर दिली आहे.

उद्धव ठाकरेंना झोप लागणार नाही – किरीट सोमय्या

पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्यांनी यावर प्रतिक्रिया देत मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली आहे. उद्धव ठाकरेंचे सरकार माफिया सरकार आहे. श्रीधर पाटणकर यांच्या बँक खात्यातून पुढे कुणाला पैसे ट्रान्सफर झाले. त्याची माहिती जनतेसमोर आल्यास उद्धव ठाकरेंची झोप उडेल. पुढील काळात सर्व भ्रष्टाचाराचा हिशोब होणार असं त्यांनी सांगितले.

टॅग्स :नारायण राणे अंमलबजावणी संचालनालयउद्धव ठाकरेशिवसेना