Join us

'सृजन' साकारणार उदयोन्मुख कलाकारांचे स्वप्न

By संजय घावरे | Updated: January 29, 2024 17:35 IST

कलाकारांच्या वर्गणीतून सादर होणार 'मित्राची गोष्ट' आणि 'ज्याचा त्याचा प्रश्न' नाट्यप्रयोग

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: आज वेगवेगळ्या नाट्यसंस्थांच्या माध्यमातून उदयोन्मुख कलाकारांना व्यासपीठ मिळत आहेत. लेखक-दिग्दर्शक-अभिनेता राजेश देशपांडे यांच्या सृजन द क्रिएशनने नेहमीच नवीन कलाकारांना मदतीचा हात पुढे केला आहे. श्री शिवाजी नाट्य मंदिरमध्ये दोन नाटकांचे प्रयोग सादर करत सृजन नवीन कलाकारांचे स्वप्न साकार करणार आहे.

नव्या कलाकारांना घडवत त्यांना उत्तम व्यासपीठ मिळावे या उद्देशाने 'सृजन'ने एक मिशन सुरू केले. 'सृजन द क्रिएशन' ही फक्त कार्यशाळा नसून नवीन कलाकारांना संधी देणारी संस्था आहे. 'आपली स्पर्धा स्वतःशीच करावी' हा मंत्र प्रत्येकाच्या मनावर बिंबवत आजवर वेगवेगळया उपक्रमांद्वारे सृजनच्या कलाकारांनी विविध स्पर्धांमध्ये जवळपास ३० पेक्षा अधिक एकांकिका, बरेच दिर्घांक, ४० लघुपट बनवत पुरस्कारही पटकावले आहेत. यापैकीच एक असलेले विजय तेंडुलकर लिखित 'मित्राची गोष्ट' आणि अभिराम भडकमकर लिखित 'ज्याचा त्याचा प्रश्न' या दोन नाटकांचे प्रयोग दादर येथील श्री शिवाजी मंदिर येथे रंगणार आहेत. कलाकारांनी वर्गणी काढून दोन नाट्यप्रयोग सादर करणार आहेत. ५ फेब्रुवारीला दुपारी ३.३० वाजता 'ज्याचा त्याचा प्रश्न' आणि  ६ फेब्रुवारीला रात्री ८ वाजता 'मित्राची गोष्ट' या नाटकाचा प्रयोग होणार आहे.

नवोदित कलाकारांना घडवण्याची हि चळवळ सभासदांच्या वर्गणीमधून जमा झालेल्या रक्कमेवर, सहभागी कलाकारांनी वर्गणी काढून तसेच सृजन द क्रिएशनचे सर्वेसर्वा अभिनेता-दिग्दर्शक राजेश देशपांडे यांच्या प्रयत्नांनी सुरु  आहे. या प्रयत्नांना बळ देत उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी अधिकाधिक नाट्यरसिकांनी या प्रयोगांना उपस्थित राहण्याचे आवाहन देशपांडे यांनी केले आहे.

टॅग्स :नाटक