मुंबई : हार्वर्ड बिझनेस स्कूल या जागतिक कीर्तीप्राप्त शिक्षण संस्थेचे डीन श्रीकांत दातार यांचा यावर्षीच्या ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर ग्लोबल इम्पॅक्ट’ या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. अमेरिकेच्या बोस्टन शहरात कठोर कोविड प्रोटोकॉल सांभाळून दातार यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या एका छोट्या समारंभात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी सुमा फुड्स न्यू जर्सीच्या व्यवस्थापकीय संचालक हेमल ढवळीकर, हेड ऑपरेशन्स मेधा जोशी, न्यू जर्सी कामगार विभागाच्या समुपदेशक डॉ. सोनाली करजगीकर, बृहन महाराष्ट्र मंडळाचे विश्वस्त व संयोजक बाळ महाले, न्यू इंग्लंड मराठी मंडळाचे अध्यक्ष संतोष साळवी यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा लोकमत आणि महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने प्रदान करण्यात आला. लोकमतची टीम मुंबईहून ऑनलाइनच्या माध्यमातून त्यात सहभाग झाली होती.
आपल्याला दिलेली ट्रॉफी अत्यंत मोहक आणि अप्रतिम आहे. माझ्या मातृभूमीतून हा पुरस्कार मला मिळाला आहे, अशी सुरुवात करून श्रीकांत दातार पुरस्काराला उत्तर देताना म्हणाले, हार्वर्डचा भाग बनणे, या वातावरणाचा अनुभव घेणे हा माझ्यासाठी खूप मोठा ठेवा आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी प्रवास आणि इतर आव्हानांची पर्वा न करता अधिक प्रमाणात जोडली जात आहेत. तसेच संवाद साधण्यात आणि शिक्षण प्रक्रियेत भाग घेण्यात पुढे येत आहेत.
साथीच्या रोगानंतर जगात काय घडत आहे, हे जाणून घेण्यास आता विद्यार्थ्यांना खूप रस आहे. म्हणूनच आपण त्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विचारशील आणि प्रगत नेतृत्व घडवले पाहिजे, असेही दातार म्हणाले. व्यवसायवृद्धीसाठी विचार करणे आणि त्याचबरोबर व्यवसायांना समाजासाठी योगदान देण्याकरिता प्रवृत्त करणे, हा आपल्या पदाचा प्रमुख भाग आहे. भविष्यात भारतीय समाजाला जास्तीत जास्त मदत करण्याची त्यांनी ग्वाही दिली.
‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्कार सोहळा, महाराष्ट्र दिनी म्हणजे आज १ मे रोजी रात्री ९.३० वाजता ‘शेमारू मराठीबाणा’ या चित्रपट वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.