घटाघटातच श्रीराम विराजे!
By admin | Published: March 27, 2015 10:52 PM2015-03-27T22:52:42+5:302015-03-27T22:52:42+5:30
ध्येय सर्वभूतस्थित रामाला बघणे आहे. पण अर्थातच ते इतके सोपे नाही. या रामरूपी परब्रह्माची दोन रूपे आहेत. स्थूल आणि सूक्ष्म. स्थूलरूपाने तो दशरथनंदन आहे
पले ध्येय सर्वभूतस्थित रामाला बघणे आहे. पण अर्थातच ते इतके सोपे नाही. या रामरूपी परब्रह्माची दोन रूपे आहेत. स्थूल आणि सूक्ष्म. स्थूलरूपाने तो दशरथनंदन आहे आणि सूक्ष्मरूपाने हृदयस्थ ईश्वर आहे. भक्तांवर कृपा करण्यासाठी हे निर्गुण ब्रह्म सगुण रूप धारण करते. त्या सगुण रूपाला आधी जाणू या.
वाल्मीकींनी नारदांना प्रश्न केला, हे महर्षी, या वेळी या भूलोकावर गुणसंपन्न असा कोण आहे? वीर्यवान, धर्माचे रहस्य जाणणारा, कृतज्ञ, सत्यवचनी, सदाचारी, विद्वान, समर्थ, प्रियदर्शन मनोनिग्रही, क्रोधाला जिंकलेला, तेजस्वी असा कोण आहे? हे जाणण्यास मी उत्सुक आहे. आपण तो सांगायला समर्थ आहात. तेव्हा नारदमुनी आनंदित होऊन म्हणाले, ‘इश्वाकुकुळात जन्मलेला राम आत्मसंयमी, महावीर्यवान, तेजस्वी, धैर्यवान, जितेंद्रिय, बुद्धिमान, नीतिमान, वक्ता, वैभवशाली आणि शत्रुनाशक आहे. यानंतर नारदांनी अगोदर श्रीरामाचे वर्णन केले. त्यानंतर रामाच्या यौवराज्याभिषेकापासून ते राज्याभिषेकापर्यंत घडलेल्या सगळ्या घटना कथन केल्या.
नारदांकडून हे रामचरित्र श्रवण केल्यावर वाल्मीकी माध्यान्ह स्नानासाठी तमसा नदीवर जात असताना त्यांना क्रौंचवधाचे ते दुष्कृत्य पाहायला मिळाले. त्यांच्या मनात करुणा आली आणि त्यांनी श्लोकबद्ध शापवाणी उच्चारली. तेव्हा ब्रह्मदेव प्रकट झाले आणि म्हणाले,
‘हे वाल्मीकी, मम इच्छेने,
जिव्हाग्रे सरस्वती,
वर्णन कर तू रामचरित्रा,’
ब्रह्मदेव वदती।
‘तोच मनोहर धर्मात्मा तो,
धीर, वीर जगती, आत्मसंयमी,
जितेंद्रिय तो धर्माची मूर्ती
कथिली तुजला देवर्षिने
रामचरित महती,
वर्णन कर तू रामचरित्रा,’
ब्रह्मदेव वदती।
रक्षणकर्ता धर्माचा तो,
सत्यवचनी कीर्ती,
कालाग्नि जणु क्रोधे,
तरीही क्षमेत तो धरती,
महावीर तो शत्रुनाशक,
करुणेची मूर्ती,
वर्णन कर तू,
रामचरित्रा, ब्रह्मदेव वदती।
विदीत होईल सर्व तुला ते करतलामलकवती,
सादर कर मग,
रामकथेला, प्रासादिक अनुभूती,
जोवर पर्वत नद्या भूतली,
श्रद्धा रामाप्रति,
वर्णन कर तू रामचरित्रा,
ब्रह्मदेव वदती।
ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार वाल्मीकी यथाविधी आचमन करून हात जोडून बसले असता योगधर्मामुळे श्रीरामचरित्राचे त्यांना ज्ञान होऊ लागले. वनवासात घडलेल्या घटनाही त्यांना करतलामलकवत म्हणजे करतळावरच्या आवळ्याप्रमाणे स्पष्ट दिसू लागल्या. याप्रमाणे संपूर्ण चरित्र अवलोकन केल्यावर त्यांनी रघुवंशामध्ये अवतीर्ण झालेल्या श्रीरामाचे चरित्र ग्रथित केले ते रामायण. दशरथ राजा प्रतापी होता, धर्मज्ञ होता, उदार अंत:करणाने युक्त होता. पण त्याला वंश चालविणारा पुत्र नव्हता. त्याने वसिष्ठ ऋषींच्या अधिपत्याखाली अश्वमेध यज्ञ केला. पुत्रकामेष्टी यज्ञ चालू असताना अग्नीतून एक महापुरुष निघाला. त्याच्या हातात दिव्य पायसाने भरलेली थाळी होती. त्याने दशरथाला ते पायस (खीर) त्याच्या राण्यांना द्यायला सांगितले. त्याप्रमाणे दशरथ राजाने आपल्या राण्यांना ते पायस विभागून अर्पण केले. कौसल्येला पायसाचा अर्धा भाग दिला. सुमित्रेला अगोदर एक चतुर्थांश व नंतर पुन्हा एक अष्टमांश भाग दिला. कैकेयीला एक अष्टमांश भाग दिला. राण्यांनी ते पायस भक्षण केल्यावर त्यांना गर्भधारणा झाली.
अश्वमेध यज्ञ समाप्त झाल्यावर सहा ऋतू लोटल्यावर चैत्रातील शुद्ध नवमीला लोकांना पूज्य असा जगदीश्वर राम कौसल्येच्या ठिकाणी उत्पन्न झाला.
अश्वमेध यज्ञ पूर्ण हो ऋतु सहा,
द्वादश हो मास, चैत्र नवमी ही पहा,
पाच ग्रह उच्च, नक्षत्र पुनर्वसु,
कर्क राशी असती लग्नी, चंद्र नी गुरू,
कौसल्येस दिव्य असा पुत्र जाहला,
जगदीश्वर, पूजनीय राम जन्मला।
विष्णुचा अवतार, इश्वाकुनंदन,
लोहिताश महाबाहु, उच्च रोदन,
इंद्रवरे, तेजस्वी अदिती शोभते,
कौसल्या पुत्रयोगे तशीच भासते,
गगनातून सुमनांचा वर्षाव जाहला,
जगदीश्वर, पूजनीय राम जन्मला।
या दिव्य बालकाचे नेत्र आणि ओठ लालसर, बाहू लांब असून ते बालक सर्व शुभचिन्हांनी युक्त होते. कौसल्येच्या या भागामध्ये भगवान विष्णूच्या शक्तीचा निम्मा भाग प्रकट होत होता. नंतर लगेच कैकेयीने एका पुत्राला जन्म दिला. त्यानंतर कौसल्येच्या पुत्राच्या आगमनाच्या दोन दिवसांनंतर सुमित्रेने दोन जुळ्या बालकांना जन्म दिला. या चारही पुत्रांना बघण्यात सर्वांना अतिशय आनंद होत होता. अयोध्येत आनंदसोहळा साजरा झाला.
वसिष्ठांनी सर्व पुत्रांचा नामविधी पार पाडला. कौसल्येच्या पुत्राला राम; कैकयीच्या पुत्राला भरत असे नाव दिले. तर सुमित्रेच्या जुळ्या पुत्रांची नावे लक्ष्मण आणि शत्रुघ्न अशी ठेवण्यात आली. वसिष्ठांनी सर्व धार्मिक संस्कार त्यांच्यावर केले. चारही बंधू वेदशास्त्रपारंगत, कुशल योद्धे आणि सर्व दैवी गुणांचे भांडार बनले. दशरथ राजाला राम कोवळा बालक वाटत होता. राम कसा बरं यज्ञात विघ्ने आणणाऱ्या मारिच, सुबाहूंचा नाश करील, या शंकेने दशरथाला घेरले.
श्रीराम-लक्ष्मण विश्वामित्रांबरोबर गेले. विश्वामित्रांनी त्यांना विद्या दिल्या. तारका राक्षसी जरी दुष्ट होती, अनाचारी होती, तरी ती स्त्री असल्यामुळे राम तिचा वध करायला तयार होत नव्हते. पण विश्वामित्रांनी समजावून सांगितल्यावर रामाने तिचा वध केला. तो रामाचा पहिला पराक्रम. त्यांनी रामाला अत्युत्कृष्ट अशा अस्त्रविषयक मंत्रसमुदायाचा उपदेश केला. गौतम ऋषींनी आपल्या भार्येला शाप दिला होता, इतर कसल्याही प्रकारचा आहार न करता केवळ वायुभक्षण करून व भस्मात पडून राहून तू कित्येक वर्षे इथेच पडून राहशील. कोणाही प्राण्याच्या दृष्टीस न पडता तू इथेच आश्रमात वास करशील आणि दशरथपुत्र राम जेव्हा इथे येतील, तेव्हा तुझा उद्धार होईल. तुला पूर्ववत आपले शरीर प्राप्त होईल.
जेव्हा श्रीराम त्या आश्रमात पोहोचले, तेव्हा तपाच्या योगाने तिची प्रभा चोहोकडे पसरली आहे, ती अहल्या रामाला दिसली आणि रामाने तिच्या पायांना वंदन केले. तिनेही मग रामाची विधिवत पूजा केली. मग गौतम मुनी आपल्या आश्रमात पुन्हा अहल्येसह तपश्चर्या करू लागले. अहल्या शिळा झाली नव्हती... आणि रामाने तिला पदस्पर्शही केला नाही. राम मर्यादापुरुषोत्तम होते. ते कसे गौतमांच्या पत्नीला पाय लावतील?
राम पराक्रमी तर होताच. त्याचबरोबरच धर्मात्मा, धर्मज्ञ होता. जनकाच्या राजसभेत शिवधनुष्याचा भंग करून तो पण जिंकल्यावरही राम पित्याच्या संमतीनेच सीतेचे पाणिग्रहण करतो. पितृआज्ञा पाळून वनवासात जाताना चित्रकुटावर येऊन भरताने परोपरीने विनवणी करूनही राज्याचा स्वीकार करत नाहीत.
आपल्या विनम्र वर्तनाने सदाचाराचा वस्तुपाठच राम देतात. पराक्रमी रावणाचा वध केल्यावर सोन्याच्या लंकेची अभिलाषा न धरता बिभीषणाला लंकेचा राजा करतात. ‘जननी जन्मभूमीच स्वर्गादपि गरियासि।’ त्याचा त्याग केवढा... रावणवधानंतर स्वत: धर्ममर्यादांचे पालन करून इतरांच्या करवी त्यांचे पालन करविणारा आणि स्वत: नव्या मर्यादा प्रस्थापित करून त्यायोगे श्रेष्ठ नैतिक आदर्श समाजापुढे उभे करतात. म्हणून श्रीराम मर्यादापुरुषोत्तम आहेत.
का भुकेजून फिरसी,
मागसी का चार दारी,
रे तुझ्यापाशीच आहे,
रामनामाची शिदोरी।
शब्दारण्यी चकवा लागून इकडे का फिरतोयस? तुझ्याजवळ रामनामाची शिदोरी आहे. हे जाण आणि तृप्त हो. श्रीरामांची स्तुती करावी. पूजा करावी, स्मरण, वंदन करावे, सर्व भुतांच्या ठिकाणी श्रीरामभाव ठेवावा.
अयोध्यापती तो आहे क्षमाशील,
तारून जाशील, भवसिंधु।
जानकीचा राम, जाणुनीया घ्यावा,
मुखी येऊ द्यावा, निरंतर।
त्या एकवचनी, एकवाणी, एकपत्नी मर्यादापुरुषोत्तमाची
कथा जाणून घ्यावी,
ब्रह्मांड भेदून पल्याड न्यावी.
राम... एक शोध... कसा आहे राम? श्रीराम सर्व प्राणिमात्रांमध्ये आत्मरूपाने राहत आहे, तर मग तो अयोध्येचा राजा, दशरथी राम कसा? होय तो दशरथी रामच... तो मर्यादापुरुषोत्तम राम. विष्णूच्या दहा अवतारांपैकी सातवा अवतार... रावणाचा वध करण्यासाठी इश्वाकुकुळात दशरथपुत्र म्हणून रामाने मनुष्यरूप धारण केले. पण परमेश्वराचे अवतारकार्य दुष्टांच्या संहारापुरतेच सीमित नसते. धर्माची स्थापना करणे हे त्याचे मुख्य कार्य. त्यासाठीच धर्माचा उच्छेद करणाऱ्या रावणासारख्या दुष्टांचा संहार तो करतो आणि त्यांच्यापासून साधूंचे रक्षण तो करतो. दुष्टांचा संहार, साधूंचे रक्षण आणि धर्माची पुन:स्थापना असे कार्य करणारा प्रभू श्रीराम...