Join us

‘एमएमआरडीए’च्या आयुक्तपदी श्रीनिवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या महानगर आयुक्तपदी अखेर राज्याच्या गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या महानगर आयुक्तपदी अखेर राज्याच्या गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आर. ए. राजीव यांचा महानगर आयुक्तपदाचा सहा महिन्यांचा वाढीव कार्यकाळ ३१ मे रोजी संपुष्टात आला होता. त्यानंतर प्राधिकरणाच्या अतिरिक्त महानगर आयुक्त सोनिया सेठी यांच्याकडे महानगर आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला. त्यामुळे प्राधिकरणाच्या आयुक्तपदी कोणाची नियुक्ती हाेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर ३ जून रोजी याबाबत करण्यात आलेल्या नियुक्तीनुसार प्राधिकरणाचे आयुक्त म्हणून आता श्रीनिवास काम पाहणार आहेत.

एस. व्ही. आर श्रीनिवास हे १९९१च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. एमएमआरडीए महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांना मुदतवाढ नाकारण्यात आल्यामुळे ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरू झाली होती. अखेर त्यांच्या जागी श्रीनिवास यांची नियुक्ती करण्यात आली तर श्रीनिवास यांच्या जागी मिलिंद म्हैसकर यांची नियुक्ती करण्यात आली. श्रीनिवास यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचीही जबाबदारी हाताळली आहे. शिवाय यापूर्वी ते ‘एमएमआरडीए’मध्ये अतिरिक्त महानगर आयुक्त म्हणूनही कार्यरत होते. मेट्रोचे काम वेळेत मार्गी लावण्यासह मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि मेट्रोचे उर्वरित प्रकल्प कोरोना काळात वेळेत मार्गी लावण्याचे आव्हान श्रीनिवास यांच्यासमोर असेल.

................................