Join us

एसआरपीएफच्या जवानाने स्वत:वर झाडली गोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 5:44 AM

राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) जवानाने, एसआरपीएफ गट ८ च्या मुख्यालयातच स्वत:वर झाडलेल्या गोळीतून जखमी झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली.

मुंबई : राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) जवानाने, एसआरपीएफ गट ८ च्या मुख्यालयातच स्वत:वर झाडलेल्या गोळीतून जखमी झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली. हा अपघात होता की आत्महत्येचा प्रयत्न, या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. नवनाथ यादव (३५) असे जवानाचे नाव असून, त्याच्यावर मालाडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकती स्थिर असल्याचे समजते.यादव हे पोलीस शिपाई आहेत. यापूर्वी गडचिरोलीला सेवा बजावून ते गोरेगाव येथील एसआरपीएफच्या गट ८ मध्ये रुजू झाले. ते येथीलच बॅचलर्स बरॅकमध्ये २० अन्य जवानांसोबत राहतात. सहा महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाला. सोमवारी सकाळी ११च्या सुमारास ते बंदोबस्तावरून मुख्यालयात आले. ते गाडीत एकटे असताना, अचानक जोराचा आवाज झाला. अन्य जवानांनी त्यांच्याकडे धाव घेतली, तोवर गोळी त्यांच्या छातीत घुसली होती. त्यांना तत्काळ जोगेश्वरीच्या ट्रामा केअर रुग्णालयात दाखल केले. प्रकती चिंताजनक असल्याने, त्यांना मालाडच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. वेळीच उपचार सुरू केल्यामुळे ते थोडक्यात यातून बचावले आहेत.यादवची प्रकृती स्थिर आहे. अद्याप त्याचा जबाब नोंदविलेला नाही. जबाब नोंदविल्यानंतर घटनेमागचे नेमके कारण समोर येणार असल्याचे एसआरपीएफ ८ चे कमांडंट महेश घुर्ये यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तसेच आतापर्यंत त्याने कुठलीही तक्रार केलेली नाही. त्याचे रेकॉर्डही चांगले आहे. त्यामुळे जबाबानंतरच योग्य कारण समजू शकेन असे घुर्ये यांचे म्हणणे आहे.प्राथमिक तपासात, यादवचा नुकताच विवाह झाला होता. घरासाठी तो तणावाखाली असल्याचे समजते. कारण त्याच्या पत्नीलाही मुंबईत येऊन राहायचे होते. त्याच्याकडे कुठल्याही स्वरुपाची सुसाईट नोट मिळालेली नाही. त्यामुळे त्याच्या जबाबातूनच घटनेचे मुख्य कारण समोर येणार आहे.