जहांगीर आर्ट गॅलरीत अवतरली 'सृजनसृष्टी'

By संजय घावरे | Published: September 3, 2024 08:09 PM2024-09-03T20:09:23+5:302024-09-03T20:09:57+5:30

सतिश गायकवाड यांच्या चित्रांचे प्रदर्शन

srujanshritti incarnated at jehangir art gallery | जहांगीर आर्ट गॅलरीत अवतरली 'सृजनसृष्टी'

जहांगीर आर्ट गॅलरीत अवतरली 'सृजनसृष्टी'

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई - जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये निसर्गाची अनुभूती देणारी 'सृजनसृष्टी' अवतरली आहे. जहांगीर आर्ट गॅलरीत २ सप्टेंबरपासून सुरू असलेले सतिश गायकवाड यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन कलाप्रेमींचे लक्ष वेधत आहे. ८ सप्टेंबरपर्यंत हे प्रदर्शन कलाप्रेमींसाठी खुले राहील.

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आर्वी गावचे रहिवासी असलेल्या चित्रकार सतिश गायकवाड यांच्या कुंचल्यातून साकारलेल्या निसर्ग सौंदर्याची लयलूट करत सांगीतिक अनुभूती 'सृजनसृष्टी' या चित्रप्रदर्शनात अनुभवायला मिळत आहे. 'सृजनसृष्टी' या चित्रप्रदर्शनाच्या निमित्ताने गायकवाड यांनी निसर्गातील विविध छटा आणि आकृत्या कॅनव्हासवर उतरवल्या आहेत. निसर्गातील रंगांची अचूक उधळण करत त्यांनी रेखाटलेली चित्रे खऱ्या अर्थाने निसर्गाच्या सान्निध्यात नेणारी आहेत. यात निसर्गातील डोंगर, दऱ्या-खोऱ्या, प्राणी, व्यक्ती, घरे, नदी, कलाकार, निळेशार आकाश, गर्द हिरवी झाडे या सर्वांचा समावेश 'सृजनसृष्टी'मध्ये करण्यात आला आहे. यासाठी गायकवाड यांनी ॲक्रीलिक रंग व तैल रंगांचा वापर केला आहे. 

गायकवाड विद्यार्थीदशेत असताना कलाशिक्षक मा. टी. आर. पाटील यांनी त्यांच्यातील सुप्त कलागुणांना  ओळखून चिमुकल्या हातात कुंचला देऊन त्याच्यातील उर्मी जागृत केली. कुटुंबात कोणताही कलेचा वारसा नसताना आई सत्यभामा व वडील रामचंद्र गायकवाड यांच्या प्रोत्साहनामुळे व पाटील सरांच्या मार्गदर्शनामुळे कलाक्षेत्रातील एका व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत मोलाचे मार्गदर्शन लाभले व त्यांच्या आयुष्याला योग्य कलाटणी मिळाली.

अत्यंत  प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी बेळगाव येथून ए.टी.डी.चे शिक्षण पूर्ण केले. जी.डी.आर्टची पदवी घेत असताना कला विश्व महाविद्यालयात त्यांना प्राचार्यांचे मार्गदर्शन लाभले. त्यामुळे व्यक्तिचित्र, रचना चित्र तसेच निसर्गचित्र यामध्ये त्यांना प्रावीण्य प्राप्त झाले. यानंतर डीप.ए. एड.ची पदवी अभिनव कला महाविद्यालय पुणे येथून घेताना पेंटींग व प्रिंट याबाबतचा सखोल अभ्यास केला. ओरीसा राज्यातील ललित कला अँकॅडमी, भुवनेश्वर येथे लिथोग्राफी व ईचींग याबाबतचा सखोल अभ्यास केला.

Web Title: srujanshritti incarnated at jehangir art gallery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई