दहावी-बारावीचे वर्ग ऑनलाइन की ऑफलाइन?; शिक्षक-मुख्याध्यापक संभ्रमात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 07:39 AM2022-01-11T07:39:03+5:302022-01-11T07:39:10+5:30
स्पष्ट सूचना नसल्याने शिक्षक-मुख्याध्यापक संभ्रमात
मुंबई : राज्य शासनाच्या निर्बंधांतील सूचनांनुसार राज्यातील शाळा-महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार असून, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवायचे उपक्रम आणि अध्यापनाव्यतिरिक्तचे प्रशासकीय कामकाज याला सूट राहणार आहे. पण, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग ऑनलाइन की ऑफलाइन भरवायचे, यासंदर्भात कोणत्याही स्पष्ट सूचना शिक्षण विभागाकडून नसल्याने शिक्षक व मुख्याध्यापक संभ्रमात पडले आहेत. राज्य शासनाने निर्बंध जाहीर केल्यानंतर सविस्तर सूचना शाळांना देणे शिक्षण विभागाकडून अपेक्षित होते. मात्र, तशा कोणत्याही सूचना आल्या नसल्याने परीक्षा तोंडावर आली असताना वर्ग प्रत्यक्षात भरवायचे की नाहीत, हा प्रश्न शाळा व्यवस्थापनासमोर उभा राहिला आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या जाहीर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे दहावीची लेखी परीक्षा ही १५ मार्च ते १८ एप्रिल, तर बारावीची लेखी परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिलदरम्यान होणार आहे. त्याआधी त्यांची प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा होणार आहे. अशा परिस्थितीत १५ फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकविले तर त्यांच्या पूर्वपरीक्षा कधी घेणार? विद्यार्थ्यांचा लेखी परीक्षांसाठीचा सराव कधी होणार, असा प्रश्न मुख्याध्यापक आणि शिक्षक विचारत आहेत. तर सरावाशिवाय विद्यार्थी दहावी-बारावीच्या परीक्षांना सामोरे गेल्यास त्यांच्या निकालावर परिणामाची शक्यता असल्याचे मत शिक्षक व पालक व्यक्त करीत आहेत. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण सुरूच आहे, त्यामुळे त्यांची प्रत्यक्ष उपस्थिती ठेवावी, अशी मागणी विद्यार्थी-पालक करीत आहेत.
शिक्षकांची वर्क फ्रॉम होमची मागणी
प्रत्येक शाळॆत एखादा किंवा एकाहून अधिक कर्मचारी, शिक्षक आजारी आहे किंवा कोरोनाची लागण झाली असा आहे. अशा परिस्थितीत सर्व शाळा बंद ठेवूनच दहावी-बारावीचे वर्गही ऑनलाइनच ठेवावेत आणि शिक्षकांना पुढील आठवडाभर शाळेत न बोलावता वर्क फ्रॉम होम करू द्यावे, अशी मागणी राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केली आहे.