दहावी-बारावीच्या निकालाला लेटमार्क लागण्याची शक्यता; उत्तरपत्रिकांचे गठ्ठे जसेच्या तसे!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 10:37 AM2022-03-26T10:37:17+5:302022-03-26T10:40:01+5:30
मुंबई: माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सुरू असलेल्या दहावी , बारावी परीक्षेतील उत्तरपत्रिका तपासणीवर विनाअनुदानित शिक्षकांनी बहिष्कार टाकला ...
मुंबई: माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सुरू असलेल्या दहावी, बारावी परीक्षेतील उत्तरपत्रिका तपासणीवर विनाअनुदानित शिक्षकांनी बहिष्कार टाकला आहे. अनेक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तपासणीविना पडून आहेत. निकालाला उशीर झाल्यास त्यासाठी कृती समिती जबाबदार राहणार नाही, असा इशारा शालेय शिक्षण विभाग आणि राज्य मंडळाला विनाअनुदानित कृती समितीने दिला आहे.
विनाअनुदानित शिक्षकांनी अनुदानाच्या मागणीसाठी विविध टप्प्यांत आंदोलन केले. दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. मुंबई विभागातील अनेक शाळा, महाविद्यालयांमध्ये उत्तरपत्रिका तपासणीसाठी शिक्षकांकडे पोहोचविण्यात आलेले गठ्ठे जसेच्या तसे आहेत. उत्तरपत्रिका तपासणी झालेलीच नसल्याची माहिती विनाअनुदानित कृती समितीचे मुंबई अध्यक्ष संजय डावरे यांनी दिली आहे.
शालेय शिक्षण विभाग जर आमच्या मागण्यांच्या याबाबतीत सकारात्मक नसेल तर विनाअनुदानित शाळांमधील अनेक शिक्षक उत्तरपत्रिका तपासणीसाठी सहकार्य करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दहावी, बारावी दोन्ही इयत्तांच्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तसेच पडून आहेत.
मुंबई विभागीय मंडळाकडून राज्य मंडळाला निवेदन सादर-
२४ फेब्रुवारी २०२२ रोजी विनाअनुदानित कृती समितीकडून मुंबई विभागीय सचिवांना बहिष्काराविषयी कल्पना देऊन त्यासंबंधित पत्र दिले. त्यावर तत्काळ कार्यवाही करीत मुंबई विभागीय सचिवांनी त्यासंदर्भातील निवेदन राज्य शिक्षण मंडळाला दिले असल्याची माहिती दिली आहे. अद्याप कार्यवाही न झाल्याने विनाअनुदानित कृती समितीच्या मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील, तसेच दहावी-बारावीचे कोणतेच पेपर कुठल्याच परिस्थितीत तपासले जाणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले आहे.
शासनाला शिक्षकांचे हाल दिसत नाहीत का?-
गेले २२ वर्षे विनामोबदला काम करताना संबंधित अधिकारी आणि शासन याना शिक्षकांचे हाल दिसले नाहीत का? शासनाला जर खरच काळजी असेल तर आमच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा त्याच्याच कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल याची नोंद घ्यावी, असा इशारा विनाअनुदानित शाळा कृती समितीने दिला आहे.
उशिरा निकालाची जबाबदारी शासनाची-
राज्यातील सुमारे सहा हजार विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना शंभर टक्के पगार देण्याचे व सेवा संरक्षण देण्याचे दिलेले आश्वासन राज्य सरकारने अद्यापही पाळलेले नाही. कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत, या शाळेतील कार्यरत शिक्षकांनी यंदा दहावी व बारावी पेपर तपासणीवर बहिष्कार घातला आहे. यामुळे निकालावर प्रचंड मोठा फरक पडणार आहे. निकाल उशिरा लागल्यास त्यासाठी सरकारच जबाबदार असेल. - संजय डावरे, अध्यक्ष, विनाअनुदानित कृती समिती, मुंबई
विनाअनुदानित कृती समितीने घेतलेल्या बहिष्कारासंबंधी राज्य मंडळाला निवेदन देण्यात आले आहे.- सुभाष बोरसे, सचिव, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळ