Join us

SSC Exam 2022: आत्मविश्वासाने परीक्षा द्या; विनाताण परीक्षा देण्याचे समुपदेशकांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 12:38 PM

मुंबईतून ३ लाख ७३ हजार दहावीचे परीक्षार्थी

मुंबई : दोन वर्षे प्रत्यक्ष लेखी स्वरूपात होऊ न शकलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षा यंदा आजपासून पूर्वीसारख्या म्हणजे प्रत्यक्ष पद्धतीने होत आहेत. यंदा मुंबईतून ३ लाख ७३ हजार ८४० विद्यार्थी परीक्षा देत आहेत. यंदा शाळा तिथे केंद्र योजना राबविण्यात येत असल्याने परीक्षा केंद्रांची एकूण संख्या १ हजार ७०, तर उपकेंद्रांची संख्या ३ हजार ५७३ इतकी आहे. मुंबई विभागातील एकूण ३ हजार ८२६ शाळांमध्ये यंदा दहावीची परीक्षा पार पडणार आहे. या परीक्षेसाठी एकूण ७० कस्टोडियन काम पाहणार आहेत. विद्यार्थ्यांनी कोणतीही भीती न बाळगता परीक्षांना सामोरे जावे, असे मंडळ मुंबई विभागीय मंडळाचे सचिव सुभाष बोरसे यांनी सांगितले.

दोस्तांनो चिंता सोडा, आनंदी राहा...

  • परीक्षा काळातही अभ्यासाचे नियोजन योग्य पद्धतीने करा.
  • परीक्षेचे अधिकृत वेळापत्रक नीट समजून घ्या.
  • तणावाखाली न राहता पालक, शिक्षकांशी संवाद ठेवा.
  • हॉल तिकीट, विषयानुसार आवश्यक साहित्य घ्यायला विसरू नका.
  • झालेल्या पेपरचा विचार न करता पुढच्या पेपरची तयारी करा.
  • प्रश्नपत्रिका सविस्तर वाचून प्रथम सोपे प्रश्न सोडवा.

पालकांनो मुलांच्या पाठीशी राहा 

  • मुलांचे आरोग्य सांभाळून त्यांची पुरेशी झोप व्हावी याबाबत काळजी घ्या.
  • मुलांवर दडपण, ताण, दबाव येईल, असे वागू नका. पाण्याची बाटली टोपी देऊन मुलांना परीक्षा केंद्रावर पाठवा.
  • मुले आजारी असल्यास त्यांना तत्काळ डॉक्टरांकडे घेऊन जा.

परीक्षेदरम्यान हे करू नका...

  • तासनतास अभ्यास करण्याची गरज नाही. 
  • परीक्षा काळात अजिबात जागरण करू नका.
  • गैरप्रकार करून अधिक गुण मिळवण्याच्या फंदात पडू नका. 
  • मोबाईल व सोशल मीडियाचा वापर कमी करा.

समुपदेशक काय म्हणतात...

एखाद्या घटकाचा अभ्यास झाला नसेल, तर परीक्षेपूर्वी त्याची तयारी करत बसू नका. तुमच्याकडे असलेल्या प्रश्नपत्रिकांचा सराव करा. परीक्षेविषयी कोणतीही शंका असेल, तर समुपदेशक व शिक्षकांशी मोकळेपणाने बोला. लेखी परीक्षेच्या दृष्टीने केलेल्या अभ्यासाकडे लक्ष द्या. परीक्षेनंतर निकालाची चिंता करू नका.

मुलांना निर्भय वातावरणात परीक्षा देता येईल याची मंडळाने खबरदारी घेतली आहे. अनेक बाबतीत मिळालेली सूट विचारत घेऊन विद्यार्थ्यांनी पेपर लिहावा. संयम आणि स्वतःवरचा आत्मविश्वास बाळगल्यास उत्तम यश मिळेल. तसेच पालकांनीही सकारात्मक दृष्टिकोन बाळगून परीक्षांना सामोरे जावे. - जयवंत कुलकर्णी, शिक्षक समुपदेशक 

टॅग्स :दहावीमहाराष्ट्र