- यदु जोशी मुंबई : इयत्ता दहावीची परीक्षा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घेता येणे शक्य नसल्याच्या भूमिकेवर राज्य शासन ठाम राहणार असून त्या बाबत शासनाचे नेमके म्हणणे काय मांडायचे, या बाबत सध्या खल सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. दहावीची परीक्षा रद्द करून शिक्षणाची चेष्टा करता काय, अशा कानपिचक्या मुंबई उच्च न्यायालयाने एका याचिकेप्रकरणी दिल्या होत्या. दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णयच का रद्द करू नये, अशी विचारणाही केली होती.सूत्रांनी सांगितले की शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्याशी शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चर्चा केली. शहरी आणि ग्रामीण महाराष्ट्रातही कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप आहे, मृत्यूचे आकडे कमी होताना दिसत नाहीत. अशावेळी परीक्षा घेता येणे केवळ अशक्य असल्याची भूमिका उच्च न्यायालयात मांडण्यासंदर्भात चर्चा झाली. दहावीची परीक्षा घेणे व्यवहार्य नाही आणि विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांचे जीव त्यामुळे धोक्यात येऊ शकतात, असे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रविवारी या संदर्भात वर्षा गायकवाड तसेच कुंभकोणी यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे. दहावीची परीक्षा न घेता अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्याची भूमिका शासनाकडून न्यायालयात मांडली जाईल, असेही सूत्रांनी सांगितले. ही पद्धत पारदर्शक राहील, तसेच ती मान्य नसलेल्या विद्यार्थ्यांना गुणवर्धनासाठी परीक्षेचा पर्याय खुला असेल, अशी भूमिकाही न्यायालयात मांडली जाण्याची शक्यता आहे.
१२वीच्या परीक्षेबाबत आज होणार निर्णय ?नवी दिल्ली : कोरोना प्रादुर्भावाचा बोर्डाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यावी की नको, याची चिंता बोर्डांना सतावत आहे. याचा विचार करून केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल निशंक उद्या (रविवार, २३ मे) सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांचे शिक्षणमंत्री तसेच शिक्षण सचिवांसोबत महत्त्वाची बैठक घेणार आहेत. सर्व राज्याचे शिक्षणमंत्री, सचिव, राज्यातील परीक्षा मंडळांचे अध्यक्ष आणि संबंधित घटकांचे प्रतिनिधी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी बोलविलेल्या व्हर्च्युअल बैठकीस उपस्थित राहतील.