Join us

एसटी बँकेची पदभरती रखडली, अंतर्गत वादामुळे निम्म्याहून अधिक पदे रिक्त

By नितीन जगताप | Published: December 22, 2022 6:34 AM

वादामुळे कर्मचारी भरती रखडली असून कर्मचाऱ्यांच्या अभावाचा परिणाम एसटी बँकेला बसत आहे. 

मुंबई : एसटी कर्मचारी बँकेत गेल्या आठ-दहा वर्षांपासून निम्म्याहून अधिक पदे रिक्त असून पदभरती नेमकी कोणाकडून करायची यावर व्यवस्थापन आणि संचालक मंडळ यांच्यात वाद सुरू आहे. संचालक मंडळाला महाराष्ट्र बँक फेडरेशनकडून पदभरती करून हवी आहे; तर व्यवस्थापनाला इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल (आयबीपीएस) योग्य वाटते. या वादामुळे कर्मचारी भरती रखडली असून कर्मचाऱ्यांच्या अभावाचा परिणाम एसटी बँकेला बसत आहे. 

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांची स्टेट ट्रान्स्पोर्ट को-ऑप. बँक ही अग्रणी बँक म्हणून गणली जाते. स्टेट ट्रान्स्पोर्ट को-ऑप. बँकेच्या राज्यभरात ५२ शाखा असून ११ विस्तार केंद्रे कार्यरत आहेत. एसटी महामंडळाचे ७४ हजार कर्मचारी या बँकेचे सभासद आहेत. कर्मचारी भरतीसाठी बँक व्यवस्थापन आयबीपीएसला अनुकूल आहे तर संचालक मंडळाचा आग्रह महाराष्ट्र बँक फेडरेशनकडून कर्मचारी भरती केली जावी, असा आहे. आयबीपीएसला प्राधान्य दिल्यास भरतीसाठी खर्च कमी येईल असे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे; तर फेडरेशनच्या दरांबाबत त्यांच्याशी वाटाघाटी करू; पण त्यांनाच प्राधान्य देऊ, अशी संचालक मंडळाची भूमिका आहे.

गुणवत्तेवर परिणामएसटी कर्मचाऱ्यांची बँक कायम फायद्यात असते.  या बँकेत  ठेवींवर व्याज चांगले मिळते. ठेवीही सुरक्षित राहतात. त्यामुळे याच बँकेत ठेवी ठेवण्याचा निवृत्त कर्मचारी व अधिकाऱ्यांचा कल असतो; परंतु कर्मचारी कमी असल्याने बँकेच्या कामकाजावर परिणाम होत आहे. काही ठिकाणी शिपाई काम करीत आहेत. त्यामुळे बँकेच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे सध्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे. कर्मचारी अभावामुळे अनेक चुकीच्या घटनादेखील घडल्या आहेत. आयबीपीएसमार्फत भरती व्हायला हवी. एमबीएफकडून भरती करू नये. श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस

संचालक मंडळाने महाराष्ट्र बँक फेडरेशनकडे दराबाबत वाटाघाटी करू आणि कर्मचारी भरती फेडरेशनमार्फत करू, असा निर्णय घेतला आहे.शेखर चन्ने,उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, एसटी तथा अध्यक्ष, स्टेट ट्रान्स्पोर्ट को-ऑप. बँक लि.

टॅग्स :बँक