मुंबई : विकासकांच्या फायद्यासाठी एसटी थांबा विकला गेल्याचा फलक घाटकोपर पश्चिम येथे लावण्यात आला आहे. येथील लाल बहादूर शास्त्री मार्गावरील सर्वोदय परिसरातील थांबा रस्ता रुंदीकरणात हटविण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. विकासकांच्या फायद्यासाठी थांब्याचे पाडकाम केल्याचा प्रवाशांचा आरोप आहे.एसटीचा थांबा पुन्हा उभारण्यात यावा, यासाठी जागरूक प्रवाशांनी सोशल मीडियावर घाटकोपर प्रगती मंच ग्रुप तयार केला आहे. त्यांच्याद्वारे प्रशासनाच्या विरोधात घाटकोपर परिसरात फलक लावला आहे. सर्वोदय थांब्यावर एसटीचे तिकीट आरक्षण केंद्र होते. मात्र, रस्ता रुंदीकरणासाठी एसटी थांबा पाडण्यात आल्याने आरक्षण केंद्रही बंद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी असून, एसटीच्या आरक्षणासाठी दुसरे पर्याय शोधावे लागत आहेत.जुन्नर, आळेफाटा, नारायणगाव, गोरेगाव, राजगुरूनगर, कोकण या मार्गांसह इतर २२ ठिकाणी एसटीच्या फेऱ्या घाटकोपर येथील सर्वोदय परिसरातील एसटी थांब्यावरूनच होतात. मात्र, आत येथे थांबाच नसल्याने उभे राहणे अवघड होत आहे. त्यामुळे प्रवाशांनी एकत्र येऊन थांबा पुन्हा उभारण्यात यावा, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.पालिकेकडे जागेची मागणी’प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी प्रशासन प्रयत्नशील आहे. थांबा उभारण्यासाठी पर्यायी जागा महापालिकेने देणे आवश्यक असून, तशी मागणी पालिकेकडे करण्यात आली आहे. मात्र, महानगरपालिका प्रशासनाकडून या संदर्भात कोणतेही उत्तर मिळालेले नाही, असे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
विकासकांच्या फायद्यासाठी एस.टी. थांबा विकला, घाटकोपरमध्ये प्रवाशांनी लावला फलक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2019 4:57 AM