ST Bus For Ganeshotsav: चाकरमान्यांना गणपती पावला! कोकणात २,५०० बसेस सोडणार; आजपासून आरक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 01:28 PM2022-06-25T13:28:31+5:302022-06-25T13:29:03+5:30
ST Bus For Ganeshotsav: कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २५ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर दरम्यान २,५०० जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २५ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर दरम्यान २,५०० जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात १,३०० बसेस आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. २५ जूनपासून कोकणात जाणाऱ्या गाड्यांच्या आरक्षणाला सुरुवात होणार आहे, तर ५ जुलैपासून परतीच्या गाड्यांचे आरक्षण करता येईल, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी शुक्रवारी दिली.
ॲड. परब यांनी सांगितले की, गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. यंदा सुमारे २५०० जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील, असे मंत्री ॲड. अनिल परब यांनी सांगितले. गणेशोत्सवासाठी २५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्टदरम्यान या गाड्या कोकणात रवाना होतील, तर ५ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर दरम्यान या गाड्या कोकणातून परतीच्या प्रवासाला निघतील. या बसेस आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या असून, सदर बसेसचे आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या संकेत स्थळावर, मोबाइल ॲपव्दारे, खासगी बुकिंग एजंट व त्यांचे ॲपवर उपलब्ध होणार आहे, असेही ॲड. परब यांनी सांगितले.
वाहन दुरुस्ती पथक तैनात करणार
वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरुस्ती पथकही तैनात करण्यात येणार आहेत.
येथून सुटणार गाड्या
मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, पनवेल, उरण, ठाणे १, ठाणे २, विठ्ठलवाडी, कल्याण, नालासोपारा, वसई , अर्नाळा या बसस्थानकांचा समावेश आहे.