ST Bus: लालपरीची वाहतूक सेवा आजपासून कोलमडणार? एसटी कामगार संघटना उपोषणावर ठाम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 12:53 PM2023-09-11T12:53:59+5:302023-09-11T12:54:33+5:30
ST Bus: राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ दिली आहे. परंतु, इतर प्रलंबित मागण्यांसाठी आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ४२ टक्के महागाई भत्ता करावा यासाठी एसटी कामगार संघटनेने ११ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषणाची घोषणा केली आहे.
मुंबई - राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ दिली आहे. परंतु, इतर प्रलंबित मागण्यांसाठी आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ४२ टक्के महागाई भत्ता करावा यासाठी एसटी कामगार संघटनेने ११ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषणाची घोषणा केली आहे. त्यामुळे लालपरीची वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सह्याद्री अतिथिगृहात सोमवारी दुपारी बैठक बोलावली आहे.
तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी २०१६ ते २०२० या कालावधीतील ४,८४९ कोटींची एकतर्फी पगारवाढ घोषित केली होती. त्यापैकी फक्त एक हजार ८४९ कोटींचे वाटप करण्यात आले. तर, प्रत्यक्षात तीन हजार कोटी आजही दिलेले नाहीत. या करारावर कामगार संघटनेने स्वाक्षरी केलेली नाही, असे संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले.
राज्य सरकारकडून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एसटी कामगार संघटनेची बैठक बोलावली आहे. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत राज्य सरकार काय निर्णय घेतात, त्यावर आंदोलनाची पुढील दिशा ठरेल. तोपर्यंत सोमवार सकाळपासून बेमुदत उपोषण सुरू होणार आहे.
- संदीप शिंदे,
एसटी कामगार संघटना