Join us

एसटीची वाट चुकली; व्हेइकल ट्रॅकिंग प्रणाली बंदच! प्रवाशांना बसचा ठावठिकाणा समजणे अवघड 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 9:48 AM

चार वर्षांपासून सेवा ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बेस्टप्रमाणे एसटीच्या प्रवाशांना एसटीचा ठावठिकाणा समजावा, प्रवास सोपा व्हावा, वेळ वाचावा, म्हणून एसटी महामंडळाने २०१९ मध्ये सुरू केलेल्या ‘जीपीएस’ तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीला आज मात्र ब्रेक लागला आहे. त्यामुळे तब्बल चार वर्षांपासून बंद असलेली ही प्रणाली सुरू कधी होणार, असा सवाल केला जात आहे.

राज्यभरात थाटामाटात धावणाऱ्या एसटीचे प्रवासी थांब्यासह आगारात वाट पाहत असतात. या प्रवाशांना आपली एसटी नेमकी कुठे आहे, केव्हा येणार आहे? अशा गोष्टी ‘व्हेइकल ट्रॅकिंग’ प्रणालीमुळे समजणे सोप्या होणार होत्या. मात्र, कोरोना महामारीसह इतर कारणांमुळे या कामाला ब्रेक लागला. त्यानंतर, ही प्रणाली सुरू करण्यासाठी एसटी महामंडळाकडून प्रयत्नही झाले. सलग दोन ते तीन वर्षे यासाठीचे काम सुरू असले, तरी या कामी अद्याप यश आलेले नाही.

प्रवासी अनभिज्ञ 

‘व्हेइकल ट्रॅकिंग’ प्रणाली किंवा यंत्रणेमुळे एसटी कुठपर्यंत आली, यासह तिचा माग काढणे सोपे आहे, असा दावा एसटीचाही आहे. मात्र, एसटीचा प्रवासी याबाबत अनभिज्ञ आहे. 

का सुरू केली यंत्रणा?

एसटीचे वेळापत्रक सुधारावे. एसटी अपघात झाल्यास त्वरित माहिती मिळावी.  एसटीची सद्यस्थिती प्रवाशांना समजावी. एसटी नियोजित, अधिकृत थांब्यावर थांबली नाही, तर याची माहितीही महामंडळाला मिळते. 

काम अपूर्णच 

२०१९ मध्ये प्रणालीचा शुभारंभ झाला होता. मार्च २०२० पर्यंत एसटीमध्ये प्रणाली बसवत सेवा प्रवाशांसाठी सुरू होणार होती. लॉकडाऊनमध्ये आलेल्या शिथिलतेनंतर याकामी पुन्हा सुरुवात करण्यात आली. मात्र, काम पूर्ण झाले नाही.

अद्ययावत नियंत्रण कक्ष 

एसटीच्या मुंबई सेंट्रल मध्यवर्ती कार्यालयात अद्ययावत नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली. येथून राज्यभरातील एसटीवर नियंत्रण ठेवता येते.

ॲपमध्ये काय करता येते? 

तिकीट आरक्षण, वैद्यकीय मदत, महिला सुरक्षितता, आणीबाणीच्या वेळी मदत, प्रवासी अभिप्राय, इतर सुविधा.

एसटी महामंडळाकडून व्हेइकल ट्रॅकिंग प्रणाली/यंत्रणा सुरू करण्यासाठीचे काम सुरू आहे. प्रणाली सुरू होण्याचा कालावधी आता सांगता येत नसला, तरी प्रवाशांना दिलासा देण्यासाठी काम करण्यात येत आहे. - अभिजीत भोसले, जनसंपर्क अधिकारी, एसटी महामंडळ.

चांगली योजना रखडली आहे. प्रवाशांना दिलासा देण्यासाठी व्हीटीएस प्रणाली प्राधान्याने सुरू केली पाहिजे. त्याचा फायदा प्रवाशांना होईल आणि एसटीचे प्रवासी वाढतील. - श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट एसटी कर्मचारी काँग्रेस.

 

टॅग्स :एसटी