एसटी बसचे आरक्षण ३० ऐवजी आता ६० दिवस आधीच मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 02:53 AM2019-07-25T02:53:07+5:302019-07-25T06:18:29+5:30
परिवहनमंत्री; गणेशोत्सवात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी २,२०० जादा गाड्या
मुंबई : प्रवाशांच्या सुविधेसाठी एसटी बसचे आरक्षण ३० दिवसांऐवजी आता ६० दिवस आधीच मिळणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली. एसटीने त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर प्रवाशांना ६० दिवस आधी आरक्षण करण्याची सुविधा प्राप्त करून दिली आहे. याचा लाभ महाराष्ट्रातील लाखो प्रवाशांना होणार आहे, असे रावते यांनी सांगितले.
एसटी महामंडळाने मुंबई उपनगरातून कोकणात गणपती उत्सवासाठी जाणाºया चाकरमान्यांसाठी २ हजार २०० जादा बसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या बसचे आरक्षण २७ जुलैपासून सुरू होणार आहे.
येण्या-जाण्यासाठी एकत्रिक आरक्षण
प्रवाशांना येण्या-जाण्याचे एकत्रित आरक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने ६० दिवस आधी आरक्षण करण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे कोकणात जाणाºया प्रवाशांना परतीच्या आरक्षणासाठी बस स्थानकावर ताटकळत उभे राहण्याची गरज नाही. परतीचे आरक्षणही मिळाल्यामुळे त्यांचा गणपती उत्सवाचा आनंद द्विगुणीत होण्यास मदत होईल, असे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.
गणेश उत्सवासाठी गावी जाणाºया चाकरमान्यांना एसटी प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा होणार आहे. कारण अनेकदा गणेश उत्सवासाठी गावी जातानाचे आरक्षण होते. मात्र येताना आरक्षण करणे फारच कठीण होते. त्यामुळे नियोजित दिवशी कामावर हजर राहता येत नाही. परंतु आता गावी जाण्यासह तेथून परत येतानाचे आरक्षणही त्यांना एकत्रित एकाच वेळी करता येणार आहे.
२७ जुलैपासून सुधारित आरक्षण प्रणाली
तांत्रिक बदल संगणकाच्या आॅनलाइन प्रक्रियेमध्ये करण्यासाठी आरक्षण प्रक्रिया २६ जुलै रोजी सायंकाळी ४ ते मध्यरात्री १२.३० पर्यंत बंद राहील. या कालावधीत कोणत्याही प्रकारचे आरक्षण तिकीट काढता, तसेच रद्द करता येणार नाही. २७ जुलैपासून सुधारित आरक्षण प्रणाली आरक्षणासाठी उपलब्ध असेल, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.