Join us  

रेल्वेच्या मदतीला धावली ST; स्टेशनहून निवासी भागापर्यंत प्रवाशांना मोफत सेवा देण्याचे नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 11:51 PM

Mumbai Rain News Updates: एसटी बसेस द्वारे रेल्वे स्थानकात अडकलेल्या प्रवाशांची मोफत सोय करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

Mumbai Rain News Updates: दिवसभर कोसळणाऱ्या  मुसळधार पावसामुळे रेल्वेची वाहतूक काही ठिकाणी खंडित झाली होती, तर काही ठिकाणी संथपणे सुरू होती. अशावेळी कार्यालयातून अथवा आपल्या कामधंद्यावरून घरी निघालेल्या मुंबईच्या चाकरमानांना लवकरात लवकर सुरक्षित घरी पोहोचता यावे, त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुख्यमंत्री  व एसटी महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी एसटीला मुख्य रेल्वे स्थानकाजवळ आपल्या बसेस तैनात करण्यास सांगितले. 

त्या बसेस द्वारे रेल्वे स्थानकात अडकलेल्या प्रवाशांची मोफत सोय करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार एसटीच्या मुंबई आणि ठाणे विभागाने  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, कुर्ला ठाणे, कल्याण इत्यादी महत्त्वाच्या रेल्वेस्थानकावर आपल्या १०० पेक्षा जास्त बसेस  लावून तेथून  प्रवाशांची त्यांच्या निवासी क्षेत्रापर्यंत मोफत वाहतूक करण्याचे नियोजन केले आहे.

प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला

मुसळधार पावसामुळे आधी लोकल आणि त्यानंतर रस्ते वाहतूक कोलमडल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. मुंबई आणि उपनगराला जोडणाऱ्या मुक्त मार्ग, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. शहरातील रस्त्यावर देखील पाणी साचल्याने मुंबईकरांचा वेग मंदावला होता. मुंबई महानगर क्षेत्रात मंगळवारी रात्रीपासून दमदार पावसाने हजेरी लावली. शहरात कमी अधिक प्रमाणात पावसाच्या सरी बरसत होत्या. नेहमीप्रमाणे कामासाठी घराबाहेर पडले ते कार्यालयात पोहोचले. मात्र दुपारच्या सत्रात कार्यालय सुरू होणाऱ्या नोकरदारांचा पावसामुळे पुरता खोळंबा झाला होता.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण कोकण परिसरात पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सायंकाळी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आपापल्या जिल्ह्यातील परिस्थितीनुसार शाळा, कॉलेज बंद ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार पालघरपासून ते सिंधुदुर्गपर्यंत सर्व जिल्ह्यांमध्ये शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. २० जुलै, २०२३ रोजी अनुक्रमे ठाणे, पालघर, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावर आदेश काढून सर्व संबंधित शालेय आस्थापनेस कळविण्यास सांगितले आहे. येणाऱ्या तीन दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर हा आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला आहे. 

 

टॅग्स :पाऊसमुंबईएसटीरेल्वेएकनाथ शिंदे