Join us

बाहेरील आगाराच्या एसटी बस मुंबई सेंट्रलला येणार नाहीत; काँक्रिटीकरणामुळे सोमवारपासून बस मार्गात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2024 13:34 IST

बाहेरील आगाराच्या बसेसच्या फेऱ्या पुढील दोन महिन्यांसाठी मुंबईतील इतर बसस्थानकातून सोडण्यात येणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या मुंबई सेंट्रल बसस्थानक परिसराचे काँक्रिटीकरण करण्याचे काम २३ डिसेंबर म्हणजे सोमवारपासून सुरू होणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई सेंट्रल बसस्थानकातून सुटणाऱ्या बाहेरील आगाराच्या बसेसच्या फेऱ्या पुढील दोन महिन्यांसाठी मुंबईतील इतर बसस्थानकातून सोडण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) सहकार्याने एसटीच्या राज्यभरातील १८३ बसस्थानकांच्या परिसराचे काँक्रिटीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी सुमारे ६०० कोटी रुपये एमआयडीसीमार्फत खर्च करण्यात येणार आहेत. अनेक बसस्थानक परिसराचे काम सध्या प्रगतिपथावर असून त्या अंतर्गत मुंबई सेंट्रल येथील बसस्थानक परिसराचे काँक्रिटीकरण लवकरच सुरू होणार आहे. सुमारे १९०० चौरस मीटर इतक्या परिसराचे पूर्ण काँक्रिटीकरण होणार असून त्यासाठी १ कोटी ६४ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

परळ, दादर व कुर्ला स्थानकातून सुटणार बस

राज्यभरातून बाहेरील आगाराच्या सुमारे १५५ बसफेऱ्या मुंबई सेंट्रल येथे दिवसभरात येतात. त्यातून शेकडो प्रवासी मुंबई सेंट्रल बसस्थानकामध्ये येतात. काँक्रिटीकरणाच्या कामामुळे त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी या फेऱ्या परळ, दादर व कुर्ला नेहरूनगर बसस्थानकामध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतर पूर्वीप्रमाणे या सर्व फेच्या मुंबई बसस्थानकातून सुरू राहणार आहेत.

 

टॅग्स :एसटी