Join us

एसटीने मालवाहतूक ट्रक तयार करण्यासाठी धरला वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 7:02 PM

प्रत्येक विभागातून १० प्रवासी बसचे ट्रॅकमध्ये होणार रूपांतर  

 

मुंबई :  मागील अनेक वर्षांपासून एसटी महामंडळ तोट्याचा गर्तेत आहेत. राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्याने एसटीचे उत्पन्न आणखीन घटले. आर्थिक तोट्यातून बाहेर येण्यासाठी एसटी महामंडळाने मालवाहतूकीकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एसटीने मालवाहतूक ट्रक तयार करण्यासाठी धरला वेग आहे. राज्यातील ३१ विभागांमध्ये १० वर्षांचे आयुर्मान झालेल्या आणि ६.५० लाख किमी धावलेल्या प्रत्येकी १० प्रवासी बसचे रूपांतर मालवाहतुकीमध्ये करण्याचे आदेश एसटी महामंडळाने दिले आहे. 

राज्यातील प्रत्येक विभागामध्ये जास्तीत जास्त १० ट्रॅक मालवाहतूकीसाठी तयार करण्याचे आदेश एसटी महामंडळाने राज्यातील विभागीय नियंत्रकांना दिले आहे. तर, मुंबईत येणारी गाडी मालवाहतूकीसाठी आणायचे असल्यास, त्या गाडीचे वय आठ वर्ष आणि साडे सहा लाख किमीपेक्षा जास्त धावलेली नसणाऱ्या गाड्यांचेच मालवाहतुकीसाठी रुपांतरण करून वापरण्यात येणार आहे.

 मुंबई विभागाने मालवाहतूकीच्या आवश्यकतेनुसार सहा वर्ष आणि साडे सहा लाख किलोमीटर पुर्ण झालेल्या जास्तीत जास्त वाहनांचे मालवाहतूकीसाठी आवश्यक वाहनांचे रुपांतरण करण्याचे एसटीने सांगितले आहे. तर राज्यातील ३१ विभागांमध्ये १० प्रवासी वाहनांचे मालवाहतूकीसाठी व व्यवसायाचा अंदाज घेत रूपांतर करण्याचे एसटीने राज्यातील विभाग नियंत्रकांना आदेश दिले आहे. 

एसटी महामंडळाने यापूर्वी मुंबई, पुणे, नाशिक या तीन विभागातील  प्रत्येकी दोन वाहनांना सहा वर्ष आणि ६.५० लाख किमी धावलेल्या बसचे मालवाहतूकीसाठी रुपांतरण करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, यापैकी नाशिक, पुणे येथे प्रत्येकी एक बसचे ट्रॅकमध्ये रूपांतरण केले आहे. तर, आता मुंबई विभाग वगळता, सध्या नाशिक, पुणे विभागाला दुसऱ्या बसचे रुपांतरीत न करण्याचे आदेश एसटीने दिले आहे. 

राज्य सरकारने १८ मे रोजी काढलेल्या सूचनेनुसार एसटी महामंडळ आपल्या बसमधून व्यावसायिक स्वरूपात मालवाहतूक करू शकते, त्यासाठी आवश्यकता असल्यास जुन्या एसटी बसमध्ये आवश्यक ते बदल करून त्यांचे रूपांतर मालवाहू वाहनांत करून त्याद्वारे ही मालवाहतूक करण्यात येणार आहे. सध्या एसटीकडे स्वतःची  ३०० मालवाहू ट्रॅक उपलब्ध आहेत. या ट्रॅकद्वारे नुकताच,  रत्नागिरी येथून आंब्यांच्या पेट्या बोरिवलीला पाठविण्यात आल्या होत्या. आता, एसटीने प्रवासी वाहनांचे रुपांतर ट्रक मध्ये केल्यावर  प्रत्येक विभागात १० ट्रक तयार होतील. त्यामुळे आणखीन  ३१० मालवाहतुकीसाठी ट्रक तयार होणार आहेत.

 

टॅग्स :एसटीमहाराष्ट्र