महेश चेमटे
मुंबई - राज्याची जीवनवाहिनी मानली गेलेल्या एसटी महामंडळाने कात टाकण्यास सुरुवात केली आहे. यानुसार आधुनिक आणि वातानुकूलित शिवशाहीचा एसटी ताफ्यात समावेश करण्यात आला आहे. यातच आधारकार्ड बाबत महत्वाचा आदेश देत महामंडळाने डिजिटलकडे प्रवास सुरु केल्याचे स्पष्ट होत आहे.
प्रवासादरम्यान प्रवासी सुविधाचा लाभ घेण्यासाठी मोबाईलवरील आधारकार्ड स्वीकारण्याच्या निर्णयावर एसटी महामंडळाने शिक्कामोर्तब केला आहे. या निर्णयामुळे एसटी महामंडळातील लाखो प्रवाशांना फायदा होणार असून या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना एसटी महामंडळाने सर्व विभागांना दिल्या आहेत.
ज्येष्ठ नागरिकांसह अन्य सुविधांचा लाभ मिळवण्यासाठी आधारकार्डची मूळ प्रत दाखवणे आवश्यक असते. मात्र प्रवासात हे कार्ड गहाळ होण्याचे अथवा खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात दर्शविण्यात येणारे आधारकार्ड ग्राह्य धरण्याबाबात सक्षम प्राधिकरणाने मान्यता दिली असून सदरच्या परिपत्रकाची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना वाहतूक विभागाच्या महाव्यवस्थापकांनी दिल्या आहेत.
गणेशोत्सव काळात एसटीने प्रवास करणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा टक्का मोठ्या प्रमाणात आहे. महामंडळाच्या विविध प्रवासी सवलतीचा लाभ घेण्यासाठी ओळखपत्र दाखवणे अनिवार्य आहे. यासाठी अॅप्लिकेशनवरील आधारकार्ड प्रवाशांचे ओळखपत्र म्हणून स्वीकारण्याचे आदेश राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना दिले आहेत. या निर्णयामुळे डिजिटायजेशनकडे प्रवास करणाऱ्या एसटीने पहिला टप्पा सर केल्याचे दिसून येते. यापूर्वी परिवहन विभागाने वाहन परवाना, वाहन नोंदणी प्रमाणपत्राच्या मोबाईलवरील 'सॉफ्टकॉपीला' (इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील कागद पत्र) स्वीकरण्याच्या सूचना केल्या आहेत.