मुंबई : गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ एसटीचा संप सुरूच आहे. त्याचा एसटी महामंडळाला मोठा फटका बसला आहे. या संपामुळे एसटी महामंडळाला १२०० कोटी रुपयांचा तोटा झाल्याची माहिती उपाध्यक्ष व व्यवस्थापकिय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. चेखर चन्ने म्हणाले की, गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ एसटीचा संप सुरू आहे.
संपामुळे एसटीची वाहतूक बंद असल्याने सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्यासाठी वारंवार आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला न जुमानता संपात सहभागी झालेल्यांवर कारवाई सुरू आहे. आतापर्यंत दोन हजारांहून अधिक रोजंदारीवरील कामगारांची सेवासमाप्ती करण्यात आली असून, ३१२३ कर्मचारी बडतर्फ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या संपामुळे एसटी महामंडळाला १२०० कोटींचा तोटा झाला आहे. दररोज ३०० ते ४०० कर्मचारी कामावर रुजू होत आहेत. कामगारांमधील सकारात्मक बदलामुळे कामावर रुजू होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे राज्यभरातील २५० आगारांपैकी २१५ आगारांतून वाहतूक सुरू झाली आहे. कर्तव्यावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना संरक्षण दिले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
चार लाख प्रवाशांनी केला प्रवास
एसटी संपातून माघार घेऊन कर्मचारी कामावर रुजू होण्याच्या संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत २६ हजार ५०० पर्यंत कामगार रुजू झाले आहेत. गुरुवारी २१५ आगारांतून २३८२ बस रस्त्यावर धावल्या असून, ७१३८ फेऱ्यांमधून ४ लाख प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती चन्ने यांनी दिली.
सेवानिवृत्त ४०२ चालकांपैकी ९१ चालक पात्र
संपामुळे सर्वसामान्यांची गैरसोय होऊ नये आणि त्यांना वाहतुकीची सेवा उपलब्ध व्हावी यासाठी महामंडळाने सेवानिवृत्त, तसेच कंत्राटी पद्धतीवर चालकांची नियुक्ती केली आहे. पुणे, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, धुळे, जळगाव, नागपूर आणि भंडारा येथील आगारांतून मिळून ४०० कंत्राटी चालक नेमण्यात आले आहेत. आतापर्यंत सेवानिवृत्त ४०२ चालकांचे अर्ज आले असून, त्यापैकी ९१ चालक पात्र ठरले आहेत.