मुंबई : लाॅकडाऊनमुळे एसटीचे उत्पन्न बुडाले. एसटी महामंडळाचा संचित तोटा साडेपाच हजार कोटींवर पोहोचला आहे. तीन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे पगार थकले आहेत. पगार व एसटी सुरू ठेवण्याचा किमान खर्च भागविण्यासाठी राज्य सरकारकडे ३,६०० कोटी मागितले आहेत. शिवाय एसटीचे काही आगार व स्थानक तारण ठेवून कर्ज उभारण्याचा महामंडळाचा प्रयत्न असल्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी सांगितले.एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगारासह विविध विषयांवर परिवहनमंत्र्यांनी शुक्रवारी माध्यमांना सांगितले की, स्वतःच कर्जाची उभारणी करावी या दृष्टीने एसटी महामंडळाने प्रयत्न सुरू केले आहेत. महामंडळाची स्वतःची २५० आगार आणि ६०९ स्थानके आहेत. यातील काही स्थानके, आगार तारण ठेवून २ हजार ३०० कोटींचे कर्ज काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, तारण ठेवले म्हणून आगार अथवा स्थानकांचा ताबा, मालकी बदलणार नाही, ती महामंडळाकडेच असेल.