मुंबई : शहरातील एसटी डेपोमध्ये ज्येष्ठ व अपंगांसाठी एकही व्हीलचेअर नसून, त्यांना रॅम्पचा आधार घेत बसमध्ये प्रवेश करावा लागत आहे. मात्र, वृद्ध आणि अपंगांना बसमध्ये प्रवेश घेताना त्रास होणार नाही, याची काळजी डेपोमधील कर्मचारी घेत असल्याची माहिती बसस्थानक प्रशासनाकडून देण्यात आली.परळ बस डेपोतून ठाणे, बोरिवली, दापोली, कोल्हापूर, सांगोला, लातूर, गेवराई, रत्नागिरी, अलिबाग, जेजुरी, झांझवड, खेड, गुहागर, स्वारगेट अशा विविध ठिकाणी बस रवाना हाेतात. आजूबाजूच्या तालुक्यांतील विविध गावांसाठीही येथून बस आहेत. दररोज इतर व तालुक्यात अनेक ठिकाणी १६० बस सोडतात. त्यामुळे या डेपोतून दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी ये-जा करतात. त्यात दिव्यांग आणि अपंगांची संख्या तुरळक असते, तर ज्येष्ठ नागरिकही थोड्याफार प्रमाणात प्रवास करतात. त्यांना व्हीलचेअर नसल्याने रॅम्पचा आधार घ्यावा लागत आहे. परळ स्थानकात व्हीलचेअरच नसल्यामुळे दिव्यांग प्रवाशांचे हाल हाेत आहेत. त्यांना गाडीपर्यंत जाताना खूप त्रास हाेत आहे. याबाबत काही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. व्हीलचेअरबाबत विचारणा केली, तर ती सुविधा उपलब्ध नाही. मी ७४ वर्षांचा असून, मला दम्याचा त्रास आहे. पायऱ्या चढताना दम लागतो. व्हीलचेअर असेल, तर तो त्रास कमी होईल. - शंकर गुरव, ज्येष्ठ नागरिकपरळ बसस्थानकात व्हीलचेअरबाबत माहिती घेऊन संबंधित आगार प्रमुखांच्या निदर्शनास आणून देण्यात येईल, असे एसटी महामंडळाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी राजन शेलार यांनी सांगितले.परळ एसटी डेपोमध्ये दिव्यांग, अपंग आणि ज्येष्ठांसाठी व्हीलचेअर नाही. मात्र, रॅम्प आहे. त्याचा वापर हाेत आहे; पण व्हीलचेअर उपलब्ध करून दिल्यास आणखी सोयीचे ठरेल. - दत्ता मोरे, दिव्यांग प्रवासी
एसटी डेपोत व्हीलचेअरच नाही, रॅम्पचा घेतला जातोय आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 1:03 AM