एसटीचे चालक देशात अव्वल : श्रीरंग बरगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:08 AM2021-09-18T04:08:25+5:302021-09-18T04:08:25+5:30
मुंबई : देशातील खासगी व सार्वजनिक परिवहन संस्थेच्या कोणत्याही चालकांमध्ये महाराष्ट्राच्या एसटीचे चालक हे अतिशय शिस्तप्रिय, प्रामाणिक आणि प्रशिक्षित ...
मुंबई : देशातील खासगी व सार्वजनिक परिवहन संस्थेच्या कोणत्याही चालकांमध्ये महाराष्ट्राच्या एसटीचे चालक हे अतिशय शिस्तप्रिय, प्रामाणिक आणि प्रशिक्षित असून ते देशात अव्वल ठरतात, असे मत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केले. परिवहन विभागामार्फत १७ सप्टेंबर हा वाहन चालकांच्या गौरवार्थ ‘वाहन चालक दिन’ साजरा करण्याचे निश्चित केले आहे. या वेळी एसटी कर्मचारी काँग्रेसच्या वतीने एसटी चालकांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.
एसटीमध्ये सध्या ३६ हजार ३८८ चालक कार्यरत आहेत. तब्बल १४२ दिवसांच्या खडतर प्रशिक्षणानंतर एसटीच्या चालकांना प्रत्यक्ष कामावर रुजू करून घेतले जाते. त्यांना अपघातविरहित सेवेबद्दल वेळोवेळी प्रोत्साहित केले जाते. तसेच विशिष्ट कालावधीनंतर त्यांचे समुपदेशन व प्रशिक्षण आयोजित केल्यामुळे त्यांच्या वाहन चालन पद्धतीमध्ये दिवसेंदिवस आमूलाग्र बदल घडून येत आहे. याचा परिणाम म्हणून एसटी अपघातांची संख्या इतर कोणत्याही परिवहन संस्थेपेक्षा अतिशय कमी आहे. सुरक्षित वाहन चालविण्याचे कौशल्य एसटीच्या चालकांनी आत्मसात केल्यामुळे कोट्यवधी प्रवाशांना सुरक्षित प्रवास करण्याचे अभिवचन एसटीने वेळोवेळी दिले आहे.
दळणवळण व वाहतूक क्षेत्रातील चालक हा महत्त्वाचा घटक आहे. त्याच्या भूमिकेला अनन्यसाधारण समजून १७ सप्टेंबर हा दिवस ‘चालक दिन’ म्हणून जाहीर केल्याबद्दल शासनाच्या परिवहन विभागाचे विशेष आभारसुद्धा व्यक्त करण्यात आले. या वेळी संघटनेचे विभागीय सचिव मधुकर तांबे, आगार सचिव संदीप कातकर, राहुल माने, विठ्ठल गर्जे आदी पदाधिकारी व चालक हजर होते.
170921\1941-img-20210917-wa0007.jpg
एसटी चालक सन्मान