Join us  

एस.टी.च्या चालक-वाहकांना मिळणार २० टक्के ‘प्रोत्साहन भत्ता’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 6:52 AM

प्रवाशांशी गैरवर्तणूक केल्यास पैसे नाहीत 

मुंबई : राज्य परिवहन महामंडळ (एसटी) उद्दिष्टापेक्षा वाढीव उत्पन्न आणणाऱ्या चालक आणि वाहकांना वाढीव उत्पन्नापैकी २० टक्के रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून देणार आहे. ही रक्कम दोघांना सम प्रमाणात त्याच दिवशी देण्यात येणार आहे. उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.एस. टी. महामंडळाने ऑगस्टमध्ये १६ कोटी ८६ लाख, ६१ हजार रुपये नफा मिळवला आहे. उत्पन्नवाढीत सातत्य राखण्यासाठी चालक-वाहक हा घटक अत्यंत महत्त्वाचा असून त्यांची कामगिरी चांगली व्हावी यासाठी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. सध्या एक महिन्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर वाढीव उत्पन्नावर आधारित प्रोत्साहन भत्ता योजना महामंडळाने सुरू केली आहे. 

एस. टी. महामंडळाने “प्रवासी राजा दिन”, “कामगार पालक दिन” यांसारखे उपक्रम राबवून प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे तसेच प्रत्यक्ष प्रवासात प्रवाशांना अडचण आल्यास आगार प्रमुखांचे दूरध्वनी क्रमांक प्रत्येक बसमध्ये प्रदर्शित करण्यात आले आहेत. याबरोबरच तोट्यातील आगारांना मार्गदर्शन करणे, इंधन बचतीसाठी चालक व यांत्रिक कर्मचारी यांचे समुपदेशन करणे शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत जाऊन पासचे वितरण अशा उपाययोजना महामंडळ करत आहे.

प्रवाशांशी गैरवर्तणूक केल्यास पैसे नाहीत 

प्रवाशांच्या तक्रारी, प्रवाशांशी गैरवर्तणूक अथवा उत्पन्नवाढीसाठी अवैध मार्गांचा वापर केल्यास या प्रोत्साहन भत्त्याला मुकावे लागेल, असे महामंडळाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे योग्य कामगिरी करणाऱ्या चालक-वाहकांना रोख स्वरुपात प्रोत्साहन भत्ता देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या योजनेस चांगला प्रतिसाद मिळाल्यास ती पुढे चालू ठेवण्याबाबतही निर्णय घेण्यात येईल. 

टॅग्स :महाराष्ट्रमुंबई