लिफ्ट दुरुस्त करताना एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 06:49 AM2019-12-28T06:49:16+5:302019-12-28T06:49:29+5:30
मुंबई सेंट्रलमधील लिफ्ट बंद पडल्याने पाटकर लिफ्टचे काम करीत होते
मुंबई : मुंबई सेंट्रल येथील लिफ्ट दुर्घटनेत एसटीच्या कर्मचाºयाचा मृत्यू झाला. संजय उर्फ रामानंद पाटकर (५५) असे या कर्मचाºयाचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी २.४५ वाजता एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल येथील मध्यवर्ती कार्यालयामध्ये ते नादुरुस्त लिफ्टचे काम करीत होते. त्या वेळी ही दुर्घटना घडली. पाटकर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
मुंबई सेंट्रलमधील लिफ्ट बंद पडल्याने पाटकर लिफ्टचे काम करीत होते. या वेळी अचानक लिफ्ट सुरू झाल्याने त्यांचे पाय अडकले गेले. त्यांनी आरडाओरड केली. ते ऐकून इतर कर्र्मचाऱ्यांनी लिफ्ट बंद करून त्यांना बाहेर काढले. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दुर्घटनेची माहिती मिळताच, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष रणजीत सिंह देओल हे रुग्णालयात दाखल झाले. अपघाताची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना तत्काळ मदत देण्याची प्राथमिकता असेल. चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया देओल यांनी दिली. या घटनेची चौकशी तत्काळ करावी, अशी मागणी एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी केली आहे.
चौकशीचे आदेश
पाटकर हे एसटी महामंडळाच्या मुख्यालयात वीजतंत्री म्हणून कार्यरत होते.या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचेही एसटी महामंडळाने सांगितले.