Join us

“राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे मुख्यमंत्र्यांना वेळ नाही, आंदोलन सुरु राहणार”; ST कर्मचारी ठाम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2024 7:47 PM

ST Protest News: सरकारने जर वेळेत बैठक घेतली असतील तर ही वेळ आली नसती, असे सांगत कृती समिती भूमिकेवर ठाम आहे.

ST Protest News: ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभरात संप पुकारला आहे. राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामुळे अनेक ठिकाणी प्रवाशांचे हाल झाले. यातच एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. मंत्री उदय सामंत यांच्यासोबत कृती समितीची एक बैठक पार पडली. परंतु, ही बैठक निष्फळ ठरली. 

गणपती उत्सव हा इतका मोठ्या ताकदीचा उत्सव साजरा केला असतो. असे असताना अशा प्रकारचे आंदोलन होणे हे कितपत योग्य आहे, याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. गणेशोत्सवात कोणत्याही नागरिकाला जाण्या-येण्यास त्रास होऊ नये, ही सरकारची भूमिका आहे. जनतेचा विशेषत: गणेश भक्तांचा विचार करावा, ही माझी विनंती आहे. गणेश भक्तांची गैरसोय होणार नाही, यासाठी संप मागे घ्यावा, अशी विनंती उदय सामंत यांनी केली. परंतु, कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम राहिले. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांसोबतची सरकारची ही बैठक निष्फळ ठरली आहे.

मुख्यमंत्र्यांनी उद्याच्या बैठकी एसटी कर्मचाऱ्यांसाठी योग्य तो निर्णय घ्यावा

सरकारने जर वेळेत  बैठक घेतली असतील तर ही वेळ आली नसती. मुख्यमंत्र्यांनी उद्याच्या बैठकी एसटी कर्मचाऱ्यांसाठी योग्य तो निर्णय घ्यावा. राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही आम्हाला माहिती आहे. मात्र तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार. आंदोलन मागे घेणार नाही. राज्यभर सर्व एसटी बंद आहेत. कामगारांनी स्वतःच्या हितासाठी राजकीय पाठबळ असताना हे आंदोलन उभे केले आहे. एसटी कामगारांचे वेतन राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया एसटी कामगार कृती समितीचे पदाधिकारी संदीप शिंदे यांनी दिली. 

गुणरत्न सदावर्ते हा कामगार चळवळीला डाग आहे

आमच्या मुलाबाळांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. मागील काही महिन्यात तुम्ही या विषयात राजकारण केला आहे. स्वतःचा टीआरपी वाढून झाला आहे. स्वतःचा गल्ला वाढवून झाला आहे. गुणरत्न सदावर्ते हा एसटी कामगार संघटनेला लागलेला डाग आहे. कामगार चळवळीला डाग आहे, अशी बोचरी टीका संदीप शिंदे यांनी केली. तसेच एसटी कामगारांचे वेतन वाढले पाहिजे त्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले.

दरम्यान, उद्या यासंदर्भात बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा होईल. पण राज्यात गणपती येत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज उद्या महाराष्ट्रात आहेत. गणेशोत्सव जवळ आल्यामुळे सगळे नागरिक खरेदीसाठी बाजारपेठेत जाणार आहेत. त्यामुळे एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना माझी विनंती आणि आवाहन की आपण संप करु नये. सकारात्मक चर्चेतून आपण मोठे मोठे प्रश्न सोडवलेले आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :एसटी संपएसटीएकनाथ शिंदे