Join us

एसटी कर्मचारी आणि प्रवाशांचा निर्दयीपणा

By admin | Published: September 23, 2015 1:43 AM

गाडीच्या चाकाखाली सापडलेल्या एका ६५ वर्षीय वृध्देला मदत न करता बघ्याची भूमिका घेणाऱ्या एसटी कर्मचारी आणि प्रवाशांचा निर्दयीपणा पून्हा एकदा या घटनेने समोर आला आहे

मुंबई : गाडीच्या चाकाखाली सापडलेल्या एका ६५ वर्षीय वृध्देला मदत न करता बघ्याची भूमिका घेणाऱ्या एसटी कर्मचारी आणि प्रवाशांचा निर्दयीपणा पून्हा एकदा या घटनेने समोर आला आहे. द्रौपदी त्रिभुवन असे जखमी महिलेचे नाव असून त्यांच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुंबई सेन्ट्रल येथील एसटी डेपोमध्ये ही घटना घडली. चर्नीरोड येथील रहिवासी असलेल्या त्रिभूवन या आपल्या जावयासोबत गावी जाण्यासाठी रविवारी सकाळच्या सुमारास मुंबई सेंट्रल येथील एसटी डेपोत आल्या होत्या. त्या ठिकाणी महाडच्या दिशेने जाणाऱ्या एसटीच्या धडकेने त्या खाली कोसळल्या. एसटीच्या पुढच्या चाकाखाली त्यांचा डावा पाय आला. यामध्ये रक्ताच्या थारोळ्यात वेदनेने विव्हळत असलेल्या त्रिभुवन यांनी अन्य प्रवाशांकडे मदतीचा हात मागितला. मात्र बघ्यांची भूमिका घेणाऱ्या प्रवाशांनी आणि एसटीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना मदत करण्याऐवजी मोबाईलमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढण्याला पसंती दिली. अशात बराच वेळ झाला म्हणून त्यांचा शोध घेत असताना बघ्यांच्या गर्दीत त्रिभुवन दिसल्याचे जावई दिनेश रामचंद्र मांडवकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.घटनेच्या २० ते २५ मिनिटानंतर पोलीसही दाखल झाल्याने त्यांच्यामदतीने त्रिभुवन यांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये त्यांच्यावर दोन शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. यामध्ये त्यांचा डावा पाय गुडघ्यापासून पूर्णत: निकामी झाला असल्याचेही मांडवकर यांचे म्हणणे आहे. अशात एसटी प्रशासनानेही केवळ हजार रुपये हातात टेकवून हात वर करणे पसंत केल्याची खंतही मांडवकर यांनी व्यक्त केली आहे.