एसटी कर्मचारी मतदानापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 06:55 AM2019-04-03T06:55:37+5:302019-04-03T06:56:10+5:30
एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर म्हणाले की, निवडणूक कामानिमित्तही एसटी कर्मचाऱ्यांना मतदानाच्या चार दिवस आधी कळविले जाते.
मुंबई : एसटी महामंडळातील हजारो चालक व वाहक मतदानादिवशीही कर्तव्यानिमित्त जिल्ह्याबाहेर असतात. परिणामी, संबंधित कर्मचाऱ्यांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहावे लागत असून, यामध्ये निवडणूक आयोगाने योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी एसटी कामगार सेनेने केली आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाला कळविणार असून, योग्य तो निर्णय घेण्याचे आवाहन केले जाईल, अशी प्रतिक्रिया मुंबई शहराचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी व्यक्त केली आहे.
एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर म्हणाले की, निवडणूक कामानिमित्तही एसटी कर्मचाऱ्यांना मतदानाच्या चार दिवस आधी कळविले जाते. त्यामुळे बहुतेक कर्मचारी मतदानापासून वंचित राहतात. हे रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने विशेष यंत्रणा राबवावी.