Join us

एसटी कर्मचाऱ्यांना अद्याप कोरोना योद्धा यादीत स्थान नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 4:10 AM

मुंबई : अत्यावश्यक सेवेत काम करणारे एसटीचे चालक, वाहक व इतर कर्मचारी आणि अधिकारी यांनी कोरोनाच्या काळातही जीव ...

मुंबई : अत्यावश्यक सेवेत काम करणारे एसटीचे चालक, वाहक व इतर कर्मचारी आणि अधिकारी यांनी कोरोनाच्या काळातही जीव धोक्यात घालून काम केले. मात्र, अद्याप कोरोना योद्ध्यांच्या यादीत एसटी कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.

गेल्या दीड वर्षांपासून स्वतःच्या जीवाची काळजी न करता राज्यातील एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या प्रवासासाठी सेवा देत, राज्यातील परप्रांतीय श्रमिकांना राज्याबाहेर सुखरूप सोडण्याचे कर्तव्य बजावले. हे एसटी कामगार राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून दुर्लक्षित आहेत. राज्यात ९ ऑगस्टपर्यंत कोरोनामुळे ३०४ एसटीचे कर्मचारी दगावले असून, साडेआठ हजारांच्या वर कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे. तरीही सरकारच्या कोरोना योद्ध्यांच्या यादीत एसटी कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला नाही.

एसटीचे चालक, वाहक, वाहतूक नियंत्रक, कार्यशाळा कर्मचारी व इतर संबंधित कर्मचारी अधिकारी हेही अत्यावश्यक सेवा म्हणून जीवाची पर्वा न करता कर्तव्य पार पाडत आहेत. मात्र, संकटाच्या काळात काम करत असतानाही ‘कोरोना योद्ध्यां’च्या यादीत एसटी कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे दिसून येत आहे.

तीनशे कर्मचाऱ्यांचा मृत्यू

केंद्र सरकारच्या कोरोना योद्धा यादीत एसटी कर्मचारी सोडून इतर अनेक कर्मचाऱ्यांना स्थान देण्यात आले आहे. आमच्या कर्मचाऱ्यांनी डॉक्टर, नर्स, महापालिकेचे कर्मचारी, इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची वाहतूक जोखीम पत्करत केली आहे. परप्रांतीयांना त्यांच्या राज्यात सोडण्याचे अवघड कामही केले आहे. हे करीत असताना जवळजवळ तीनशे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून, साडेआठ हजार कर्मचारी बाधित झाले आहेत, असे असताना कोरोना योद्धा यादीत नाव नसणे हे निंदनीय आहे.

श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस संघटना