BREAKING: एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानातून बाहेर काढलं, मुंबई पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 05:31 AM2022-04-09T05:31:05+5:302022-04-09T05:31:31+5:30

आझाद मैदान येथील आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी मध्यरात्री  कारवाई करत त्यांना बाहेर काढले असून यामधील ५ कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.

ST employees evicted from Azad Maidan Mumbai Police takes action | BREAKING: एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानातून बाहेर काढलं, मुंबई पोलिसांची कारवाई

BREAKING: एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानातून बाहेर काढलं, मुंबई पोलिसांची कारवाई

Next

मुंबई :

आझाद मैदान येथील आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी मध्यरात्री  कारवाई करत त्यांना बाहेर काढले असून यामधील ५ कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी सीएसएमटी स्थानकात घोषणाबाजी सुरू केली आहे. विलीनीकरणाच्या मुद्यावरून गेल्या पाच महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदान येथे आंदोलन सुरू आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी आंदोलन केल्यानंतर  मुंबई पोलिसांनी  एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदान खाली करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र एसटी कर्मचाऱ्यांनी बाहेर निघण्यास नकार दिला होता. वकील गुणरत्न सदावर्ते सांगतील तो पर्यंत आम्ही बाहेर जाणार नाही अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली होती. मात्र मध्यरात्री पोलिसांनी कारवाई करत २५० कर्मचाऱ्यांना बाहेर काढले असून यामधील ५ कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आझाद मैदानातून बाहेर काढल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी सीएसएमटी रेल्वे स्थानकात बसून ठिय्या देण्यास सुरुवात केली आहे. शेकडो कर्मचारी सीएसएमटी स्थानकात बसून सरकारविरोधात घोषणाबाजी देत आहेत. याठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील वाढविण्यात आला आहे. 

सदावर्तेंना अटक
एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'सिल्वर ओक' या निवासस्थानावर चप्पल आणि दगडफेक केल्याच्या घटनेचे पडसाद उमटले होते. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. यातच मंत्री हसन मुश्रीफ यांनी याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांची भाषणं तपासली पाहिजेत, अशी मागणी केली होती. त्यांनतर मुंबई पोलिसांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. आता त्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. सदावर्ते हे एसटी कर्मचाऱ्यांचे वकील आहेत.

आंदोलनानंतर सदावर्ते यांची प्रतिक्रिया 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी अचानकपणे आंदोलन केले. या घटनेवर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली होती. "एकशे चोवीस महिलांचे कुंकू पुसले गेले. हल्लेखोर असते, तर ते व्यथित आणि चक्कर आलेले कसे असतील? बांगड्या फोडणं हे गुलामगिरीतून बाहेर येण्याचे लक्षण आहे," असंही ते म्हणाले होते.

Web Title: ST employees evicted from Azad Maidan Mumbai Police takes action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.