एसटी कर्मचाऱ्यांना ५० टक्के वेतन मिळणार, संघटनेकडून विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 08:56 PM2020-06-24T20:56:54+5:302020-06-24T21:06:15+5:30
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाय योजना आखल्या जात आहेत.
मुंबई : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे एसटीचे आर्थिक गणित बिघडले आहे. हे आर्थिक गणित जुळविण्यासाठी, एसटीने कर्मचाऱ्यांना ५० टक्के वेतन देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने बुधवारी घेतला आहे. मात्र या निर्णयाचा एसटी कर्मचारी संघटनेकडून विरोध केला आहे. एसटी महामंडळाच्या सवलतींच्या प्रतिपूर्तीपोटी राज्य सरकारकडून २७० कोटी रूपये एसटी महामंडळास दिले आहे. त्यामुळे कर्मचा-यांच्या वेतनाचा तिढा सुटला होता. मात्र, बुधवारी प्रशासनाने मे महिन्याचे वेतन ५० टक्के वेतन करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाय योजना आखल्या जात आहेत. २३ मार्चपासून लॉकडाऊन सुरु झाले. एसटीला वाहतूक उत्पन्न नाही. परिणामी, एसटीच्या महसुलात लक्षणीय घट झाली. त्यामुळे खर्चात काटकसर करून खर्च पुढे ढकलण्याचा विचार एस टी महामंडळाचा सुरू आहे. एसटी महामंडळाकडून नॉन-रेड झोन भागांमध्ये सरकारच्या आदेशाने अंशतः बस वाहतूक सुरु करण्यात आलेली आहे. यात डिझेल आणि वेतन खर्च भागविणे कठीण झाले आहे.
एसटी महामंडळाची आर्थिक हलाखीची परिस्थिती विचारात घेता, एसटी कर्मचारी आणि अधिकारी यांच्या मे महिनाचा पगार जुनच्या एकूण वेतनाच्या ५० टक्के वेतन म्हणजेच १५ दिवसांचे एकूण वेतन अदा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मे महिन्याचा पगार ५० टक्के दिला जाणार आहे, अशा सूचना एसटी महामंडळाच्या वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी विभागाकडून दिल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या ७ तारखेस वेतन दिले जाते. मे महिन्याचा पगार २४ जून उलटून देखील झाला नसल्याने कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना अनेक कठीण प्रसंगाना सामोरे जावे लागत आहे.
एसटी महामंडळाच्या सवलतींच्या प्रतिपूर्तीपोटी राज्य सरकारकडून २७० कोटी रूपयांमधून २४९ कोटी रूपये वेतनासाठी लागणार आहेत. तर, मग उर्वरित रकमेचे काय करण्यात येणार आहे. एसटी कर्मचा-यांच्या उर्वरित ५० % वेतन कधी देणार, असा प्रश्न एसटी कर्मचारी संघटनांकडून एसटी महामंडळाला विचारण्यात आला आहे.
आणखी बातम्या...
राज्य सरकार कोरोनाच्या लढाईत पूर्णपणे अपयशी ठरलं - प्रवीण दरेकर
"पंडित नेहरू नसते तर चीनचा प्रश्नच निर्माण झाला नसता", भाजपा नेत्याचे वादग्रस्त विधान
भारताचे मंत्रालय आणि कंपन्या चिनी हॅकर्सच्या निशाण्यावर - रिपोर्ट
46 वर्षांनंतर पहिल्यांदाच PPF वरील व्याजदर होऊ शकतो 7 टक्क्यांपेक्षा कमी!
'मेड इन चायना' नको तर मग 'या' ब्रँडचे खरेदी करू शकता स्मार्टफोन