मुंबई : कोरोनाच्या काळात मालवाहतूक क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या एस.टी. महामंडळाच्या महाकार्गोला अवघ्या वर्षभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे, पण मालवाहतूक करणाऱ्या एस.टी. कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे म्हणाले, माल वाहतूक करताना १० टनांपेक्षा जास्त माल भरला जाणार नाही अशा सूचना असतानाही प्रत्यक्षात १० टनांपेक्षा जास्त माल भरला जातो. २०० कि.मी. पेक्षा कमी अंतरासाठी चालकासोबत सहकर्मचारी दिला जात नाही. त्यामुळे मालाची चढउतार करताना, गाडी मागे-पुढे घेताना अडचणी निर्माण होतात. एका विभागाच्या मालवाहतुकीचे वाहन अन्य विभागात गेल्यास कर्मचाऱ्यांना २ दिवसांपेक्षा जास्त थांबवून घेऊ नये अशा सूचना असतानाही प्रत्यक्षात ४ ते ५ व त्यापेक्षा अधिक दिवस कर्मचाऱ्यांना थांबून राहावे लागते. तसेच त्या ठिकाणी राहण्याची व नाष्टा, जेवणाची व्यवस्था केली जात नाही. मालवाहतुकीच्या कामगिरीवरील कर्मचाऱ्यांना लॉकडाऊनमुळे गाडी रखडल्यानंतर आठवडा सुट्टी जागेवरच घेण्याची सक्ती केली जाते. तसेच अन्य विभागांत असणारी मालवाहतुकीची गाडी तेथून पुढे माल वाहतूक करण्यासाठी मूळ विभागातून कर्मचारी पाठविले जातात. वास्तविक परिपत्रकीय सूचनेप्रमाणे त्या त्या विभागातील कर्मचाऱ्यांनी पुढची वाहतूक करण्याच्या सूचना असताना मूळ विभागातील कर्मचाऱ्यांना स्वखर्चाने खासगी गाडीने प्रवास करून मालाच्या ट्रकापर्यंत पोहोचावे लागते.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे शासकीय आदेशानुसार ५५ वर्षे व त्यापुढील चालकांना मालवाहतुकीसाठी पाठविण्यात येऊ नये. सध्या लॉकडाऊन, संचारबंदी सुरू असून हॉटेल व्यवसाय बंद असल्याने नाष्टा, जेवण आदींची गैरसोय होते. शासनाच्या नवीन आदेशानुसार आता मालवाहतुकीची व्याप्ती वाढणार आहे. त्यामुळे मालवाहतूक करताना येणाऱ्या समस्या दूर करणे आवश्यक आहे. वेळ, नाष्टा, जेवणाची होणारी गैरसोय विचारात घेऊन मालवाहतुकीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दररोज ३०० रुपये विशेष भत्ता देण्यात यावा. तसेच मुक्कामाच्या ठिकाणी राहण्यासाठी प्रशासनाकडून सोय करण्यात यावी. - संदीप शिंदे, अध्यक्ष.महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना