एसटी कर्मचारी पुन्हा आंदोलनाच्या तयारीत; ९, १० जुलैला आंदोलनाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 10:04 AM2024-06-27T10:04:43+5:302024-06-27T10:04:52+5:30
आंदोलनाची दखल न घेतल्यास ९ ऑगस्टला क्रांतिदिनापासून राज्यभर होणार तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे, प्रलंबित महागाई भत्ता आणि त्यातील फरक, तसेच मूळ वेतनात जाहीर केलेली पाच हजार, चार हजार, अडीच हजार रुपयांऐवजी सरसकट पाच हजार रुपयांची वाढ द्यावी यासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी पुन्हा आंदोलनाच्या तयारीत आहेत. राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एसटी कामगार संघटनांनी ९ आणि १० जुलै रोजी आझाद मैदानात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
कर्मचाऱ्यांना इनडोअर आणि आउटडोअर मेडिकल कॅशलेस योजना लागू करावी, एसटीचे खासगीकरण बंद करावे. वेळापत्रकातील त्रुटी दूर कराव्यात आदी विविध मागण्यांसाठी हे आंदोलन होणार आहे. या आंदोलनापूर्वी एसटी बँकेच्या अनागोंदीविरुद्ध सहकार आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. या आंदोलनाची दखल न घेतल्यास ९ ऑगस्टला क्रांतिदिनापासून राज्यभर होणार तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.
संघटनांचा ठराव
- याबाबतचा ठराव महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, एसटी कामगार सेना, राष्ट्रीय एसटी कामगार काँग्रेस, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटक आदी संघटनांच्या पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला.
- यावेळी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे, एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.