'सिल्वर ओक'वर ST कर्मचाऱ्यांचा राडा, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, कर्मचाऱ्यांच्या पाठिशी पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 07:16 PM2022-04-08T19:16:17+5:302022-04-08T19:16:42+5:30
एसटी कर्मचाऱ्यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'सिल्वर ओक' या निवासस्थानी जोरदार घोषणाबाजी करत आत शिरत थेट दगडफेक आणि चप्पल फेक केली.
मुंबई-
एसटी कर्मचाऱ्यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'सिल्वर ओक' या निवासस्थानी जोरदार घोषणाबाजी करत आत शिरत थेट दगडफेक आणि चप्पल फेक केली. यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पवारांच्या निवासस्थानावर करण्यात आलेल्या हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून निषेध व्यक्त करण्यात आला. जवळपास तासभराच्या या राड्यानंतर आता शरद पवार यांची या संपूर्ण प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. शरद पवार यांनी आपण एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठिशी आहोत, पण चुकीच्या नेतृत्वाच्या पाठिशी नाही, असा स्पष्ट संदेश दिला आहे.
आज माझ्या निवासस्थानाबाहेर जो प्रकार घडला त्यासंबंधी आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. कारण नेता शहाणा नसला तर कार्यकर्त्यांवरही त्याचा दुष्परिणाम होतो, त्याचे उदाहरण आज आपण पाहिले. राजकारणात मतभेद असतात, संघर्ष असतात, पण टोकाची भूमिका घेण्याची परंपरा महाराष्ट्रात नाही. pic.twitter.com/tuQImWcMxP
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 8, 2022
"मी गेल्या ५० वर्षात एसटी कर्मचाऱ्यांचं एकही अधिवेशन चुकवलेलं नाही. कारण नसताना एसटीचा कर्मचारी नोकरीच्या बाहेर राहिला. नेता चांगला नसला की कार्यकर्त्यांवर काय दुष्परिणाम होतो ते आपण आज पाहिलं. मी एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठिशी आहे. पण चुकीच्या नेतृत्वाच्या पाठिशी नाही. चुकीचं नेतृत्व चुकीच्या भूमिका घ्यायला भाग पाडतात. टोकाची भूमिका घेण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही", असं शरद पवार म्हणाले.
जितेंद्र आव्हाड म्हणाले लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस
"शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. जे काही झालं त्याचा आम्ही धिक्कार करतो. पण तो लोकशाही मार्गानं. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता कोणतीही प्रतिक्रिया यावर देणार नाही. कार्यकर्त्यांनी शांत राहावं. ज्या नेत्यानं इतकी वर्ष महाराष्ट्राचं लोकसभेत प्रतिनिधीत्व केलं. त्याच्या घरावर असा हल्ला होतो हा लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस आहे", असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
माझ्या घरावर झालेला हल्ला दुर्दैवी- सुप्रिया सुळे
"मुंबई पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे आज माझं कुटुंब वाचलं. मी मुंबई पोलिसांचे आभार मानते. आज जो माझ्या घरावर झालेला हल्ला आहे तो अत्यंत दुर्देवी आहे. मी आताही एसटी कर्मचाऱ्यांशी बोलायला तयार आहे. मी येथे आल्यापासूनच त्यांना हातजोडून विनंती करत होते की माझी आता या क्षणाला तुमच्याशी बोलायची तयारी आहे", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.